भाऊराव नानासाहेब कऱ्हाडेंच्या हैद्राबाद कस्टडी चित्रपटात पाहायला मिळणार या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:33 PM2019-02-27T19:33:24+5:302019-02-27T19:35:09+5:30
ख्वाडा आणि बबन या चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव नानासाहेब कऱ्हाडेंचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आता नव्या चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्या या नव्या चित्रपटाचे नाव हैद्राबाद कस्टडी असून त्यांनीच या चित्रपटाविषयी गप्पा नुकत्याच लोकमतच्या एका कार्यक्रमात मारल्या आहेत. लोकमत सरपंच पुरस्कार सोहळ्यात त्यांनी नुकतीच उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी उपस्थितांना सांगितले.
ख्वाडा या चित्रपटानंतर त्यांचा ‘बबन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बबन या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा त्यांनी मांडली होती. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले होते. या त्यांच्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता ते त्यांचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत.
हैद्राबाद कस्टडी असे त्यांच्या या तिसऱ्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाविषयी भाऊराव सांगतात, हा चित्रपट गुन्हेगार आणि पोलिस यांच्यावर आधारित असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत. या चित्रपटची सगळी स्टारकास्ट नवीन असून एक वेगळा विषय या चित्रपटाद्वारे आम्ही हाताळणार आहोत. या चित्रपटाला संगीत ओमकार स्वरूप, रोहित नागभिरे देणार आहेत. या दोघांनीही या आधी माझ्यासोबत काम केलेले आहे.
भाऊराव कऱ्हाडे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. ख्वाडा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्यांच्या कडे असलेला पैसा संपला होता. शेवटी त्यांनी त्यांची शेतजमीन विकून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यांचा चित्रपट खूपच चांगला असल्याने राष्ट्रीय पुरस्काराने त्यांच्या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी या चित्रपटासाठी निर्माता शोधणे भाऊराव यांच्यासाठी खूप कठीण गेले होते. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर अनेक महिन्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.