"मनीष मल्होत्राच्या पार्टीत कलाकार...", भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्ट्यांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:33 IST2025-02-24T11:32:40+5:302025-02-24T11:33:19+5:30

भूषण प्रधान आणि अनुषा सोशल मीडियावरचं लोकप्रिय कपल आहे.

bhushan pradhan talks about bollywood parties shares experience of attending manish malhotra s party with anusha dandekar | "मनीष मल्होत्राच्या पार्टीत कलाकार...", भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्ट्यांचा अनुभव

"मनीष मल्होत्राच्या पार्टीत कलाकार...", भूषण प्रधानने सांगितला बॉलिवूड पार्ट्यांचा अनुभव

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानसाठी (Bhushan Pradhan) मागील वर्ष खूप खास होतं. 'जुनं फर्निचर', 'घरत गणपती', 'लग्नकल्लोळ' हे त्याचे सिनेमे बॅक टू बॅक रिलीज झाले होते. भूषणच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. तसंच 'जुनं फर्निचर' मुळे भूषणला खऱ्या आयुष्यातली पार्टनर मिळाली. सिनेमात त्याची बायको झालेली अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आज त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यांचे कपल फोटो, व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. अनुषा बॉलिवूडमध्येही सक्रीय असते. तिची सख्खी बहीण शिबानी दांडेकर फरहान अख्तरची पत्नी आहे. अनुषामुळेच भूषणला बॉलिवूड पार्ट्यांना जाता आलं. नुकतंच त्याने मनीष मल्होत्राच्या पार्टीचा अनुभव सांगितला.

भूषण प्रधान आणि अनुषा सोशल मीडियावरचं लोकप्रिय कपल आहे. अनुषा मराठी कुटुंबातली असली तरी ती हिंदीत जास्त सक्रीय आहे. तिच्या बॉलिवूडमध्ये अनेक ओळखी आहेत. बॉलिवूडमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी अनेकदा कलाकार जमतात आणि पार्टी करतात. एकदा अनुषासोबत भूषणनेही या पार्टीला हजेरी लावली होती. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत या पार्टीचा अनुभव सांगताना तो म्हणाला, "मी काही बऱ्याच पार्ट्यांना गेलेलो नाही. फार जातही नाही. अनुषाच्या वाढदिवसाची पार्टी केली होती. नंतर एकदा मनीष मल्होत्राच्या पार्टीला गेलो होतो. खरं तर यामुळे तीही इंडस्ट्री कळली. जशी आपली इंडस्ट्री आहे, सगळे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत तसेच तेही तेवढेच जवळचे मित्र आहेत. आपण नेहमी ऐकलंय की बॉलिवूड पार्टी खूप वरवरच्या असतात पण कदाचित प्रत्येक पार्टी वेगळी असेल."

तो पुढे म्हणाला, "मनीष मल्होत्राच्या पार्टीचं सांगायचं तर तिकडे असं जाणवलं की सर्व लोक खऱ्या अर्थानो मनीषवर प्रेम करणारे होते. म्हणून जे तिथे पोहोचले ते बरेचसे त्याच्यावरील प्रेमामुळे पोहोचले होते. सगळे जण मजा मस्ती करत होते जे पाहून बरं वाटलं. बऱ्याच कलाकारांशी भेट झाली. या सगळ्या आठवणी माझ्या मनात आहेत. मोठमोठ्या कलाकारांना भेटणं, त्यांच्याकडून ती एनर्जी मिळणं, संवाद साधून चार गोष्टी शिकणं हे खूप आपोआप घडतं. पण अनुषाचे आभार कारण मी तिच्यामुळे मनीष मल्होत्राच्या पार्टीला जाऊ शकलो. हे अनुभव तिच्यामुळेच मिळाले. पण मी काही सतत पार्टीला जाऊ शकत नाही. मला घरीच राहायला आवडतं. मागच्या मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीलाही तिने मला विचारलं होतं. पण मी नाही म्हणलं. मुळात पार्टी  हा प्रकार मला आवडत नाही. त्यापेक्षा घरी भेटू, गप्पा मारु यातून खरी व्यक्तीही कळते असं मला वाटतं. असे संवाद समृद्ध करणारे असतात."

भूषण प्रधानचा शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. सुमारे दीड वर्षांपासून भूषण आणि अनुषा एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची 'जुनं फर्निचर' मध्येही चांगली केमिस्ट्री होती. तसंच सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा धुमाकूळ असतो. दोघांची मालदीव ट्रीपही खूप गाजली होती. 

Web Title: bhushan pradhan talks about bollywood parties shares experience of attending manish malhotra s party with anusha dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.