'जुनं फर्निचर'मुळे भूषण प्रधानच्या वडिलांची 'ती' इच्छा झाली पूर्ण, अभिनेत्यानेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:28 PM2024-04-20T17:28:43+5:302024-04-20T17:29:46+5:30
Bhushan Pradhan : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधानने एक गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली.
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' (Juna Furniture) चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधान(Bhushan Pradhan)ने एक गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. हा चित्रपट केल्यानंतर भूषण त्यांच्या आई बाबांना रोज आवर्जून फोन करतो. याचे कारणही त्याने सांगितले आहे. तसेच यावेळी भूषणने त्याच्या बाबांच्या मनातील एक इच्छाही पूर्ण झाल्याचे यावेळी सांगितले.
याबद्दल भूषण प्रधान म्हणाला की, प्रत्येकाला असे वाटत असते की आपण आपल्या आईबाबांसाठी खूप करतो. परंतु आईवडिलांना नक्की काय हवे आहे, हे मुलांना कळतच नाही. दिवसभरातील थोडा वेळ, प्रेमाचे, आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात आणि आपण तेच नेमके करत नाही. कामे तर होतच राहतील, परंतु आई वडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि याची जाणीव मला हा चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आईबाबांना नित्य नियमाने फोन करतो.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परीपूर्ण घर नक्कीच बनू शकते. बाबांच्या इच्छेबद्दल बोलायचे तर मी अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करतोय. परंतु महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि माझ्यापेक्षाही माझ्या वडिलांची इच्छा जास्त होती. त्यामुळे 'जुनं फर्निचर' हा चित्रपट माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. आज माझे बाबाही खूप खूश आहेत.
'जुनं फर्निचर' या दिवशी येणार भेटीला
सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर'ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर यतिन जाधव निर्माते आहेत.