'लग्न म्हटलं की तडजोड..'; स्मिता गोंदकरने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:26 PM2023-09-28T13:26:14+5:302023-09-28T13:27:24+5:30
Smita gondkar: या मुलाखतीमध्ये स्मिताने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर (smita gondkar). 'पप्पी दे पारुला' या गाण्यामुळे स्मिताने एकेकाळी तुफान लोकप्रियता मिळवली होती. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती 'बिग बॉस मराठी'मुळे. उत्तम अभिनय, सौंदर्य आणि स्वभावातील साधेपणा यामुळे स्मिता कायमच नेटकऱ्यांची मनं जिंकत असते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात. यामध्येच स्मिता लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, 'मी लग्न करणार नाही', असं स्मिताने ठामपणे सांगितलं आहे.
अलिकडेच स्मिताने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'मी कधीच लग्न करणार नाही', असं सांगितलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. परंतु, स्मिताने लग्न न करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
'तुला लग्नासाठी किती प्रपोजल्स आले आणि किती मुलांना नकार देत तू त्यांचं मन तोडलं आहे? हा आकडा मोजता येईल का?' असा प्रश्न स्मिताला विचारण्यात आला. त्यावर, "नाही..मी नाही मोजत. कारण, बिग बॉसनंतर मला खूप प्रपोजल्स आले. पण, म्हटलं नको अजिबात नको. माझ्यात एक गोष्ट आहे, जर मला जाणवलं की एखादी व्यक्ती माझ्यात इंटरेस्ट्रेड आहे तर मी लगेच स्वत:ला सावरते. माझ्यातली वाईट बादू त्यांच्यासमोर आणते. एकतर मी त्यांच्यासमोर फटकळपणे वागते किंवा जर लग्नाचा विषय काढला तर वेडा आहेस का? असं विचारते. त्यामुळे जर कोणाच्या मनात माझ्याशी लग्न करायचा विचार असेल तर त्यांना लगेच कळेत की मी लग्नाच्या विरोधात आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीला रिलेशनशीप किंवा अन्य कुठे जाण्यापूर्वीच मैत्रीकडे वळवते", असं स्मिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "लग्न म्हटलं की आपण त्या आपला वेळ, भावना गुंतवतो. पण, आजच्या काळात मला कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाहीये. प्रत्येक गोष्ट बदलत आहे. आणि, मी या सगळ्या बदलासाठी तयार नाही त्यामुळे लग्नापेक्षा मैत्री बरी, मैत्री निदान कायमस्वरुपी राहते. घरातूनही माझ्यावर लग्नासाठी दबाव येतो. पण, माझी मैत्री चांगली राहते. मात्र, रिलेशशीप चांगलं राहत नाही. मी मग, त्या नात्याला इतकी प्रायोरिटी देते की बाकी सगळं करिअर वगैरे विस्कळीत होऊन जातं. आईला वाटतं मी लग्न करावं यासाठी तिने एकदा मला विचारलंही होतं. मग मी तिला म्हटलं, तुला तुझी मुलगी आनंदात हवीये की तिने लग्न करावं असं वाटतंय? जर तुला वाटत असेल मी लग्न करावं तर तुझ्यासाठी मी करेन. पण, तू म्हणालीस की मी आनंदात असावी तर मग परत हा विषय काढू नकोस. त्यानंतर आई म्हणाली, मला तू आनंदात हवीये. त्यानंतर पुन्हा घरात लग्नाचा विषय निघाला नाही. "
दरम्यान, लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या स्मिताने लग्न का करायचं नाही हे सुद्धा सांगितलं. "मी जरा स्पष्टच बोलते. अनेकांना ते आवडणार नाही. पण, लग्न म्हटलं की तडजोडी कराव्या लागतात. त्यावेळी कुठे तरी तुम्हाला तुमचं मन मारावं लागतं. हे प्रत्येकाला करावं लागतं. मी कुठे तरी आध्यात्मिक आहे. त्यात मोठ होण्याची माझी इच्छा आहे. सुरुवातीला जेव्हा आपण तडजोड करतो त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही. पण, तुम्ही तिथे आनंदी नसता. त्यामुळे एक तर तुम्ही लग्न करु शकता किंवा मग आनंदी राहू शकता. मी आनंदी होण्याचा मार्ग निवडला", असं स्मिता म्हणाली. स्मिता लवकरच 'दिल दोस्ती दिवानगी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.