"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:21 PM2024-05-04T12:21:47+5:302024-05-04T12:22:26+5:30
Prasad Oak : प्रसाद ओक याने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत कोरोना काळातील त्याच्या आयुष्यातील एक कटू प्रसंग सांगितला.
प्रसाद ओक (Prasad Oak) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. प्रसादने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक नाटक, सिनेमांमध्ये अभिनय कौशल्य दाखवून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने अभिनयासोबत दिग्दर्शनही केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेले 'कच्चा लिंबू', 'हिरकणी', 'चंद्रमुखी' हे चित्रपट चांगलेच गाजले. दरम्यान आता प्रसाद चर्चेत आला आहे. अलिकडेच त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी त्याने एक खंतदेखील बोलून दाखवली.
प्रसाद ओक याने नुकतेच कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील कटू आठवण सांगितली. कोरोना काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं शूटिंग दमणला सुरू होते. त्यावेळी तिथेच राहून कलाकार शूटिंग करत होते. प्रसादही दमण होता. त्याच काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यावेळी त्याला वडिलांचे अंतिम दर्शनदेखील करता आले नव्हते, असे त्याने सांगितले.
दमणमध्ये करत होतो शूट
प्रसाद म्हणाला की, महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा सेट दमणमधील एका हॉटेलमध्ये बांधण्यात आला होता आणि आम्ही तिथेच शूटिंग करत होतो. २९ एप्रिलला आम्ही दमणमध्ये पोहोचलो. आम्ही सगळे तिथेच स्थायिक झालो होतो आणि ३० एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिला एपिसोडचे सकाळी ९ वाजता शूट सुरू करणार होतो. आम्ही सकाळी ६ ते ७ वाजता उठलो. आवरायला घेतले. उठून जरा फ्रेश झाल्यानंतर पाहिले तर बायकोचे ८ ते १० मिस्डकॉल आले होते. मी झोपलो होतो म्हणून मी उठल्यानंतर पाहिला फोन पाहिला. त्यावेळी तिने सांगितले की, माझे वडील गेले.
भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि मी...
वडिलांना १५ मिनिटे देखील ठेवण्याची परवानगी नव्हती. कारण त्यावेळी परिस्थिती भयंकर होती. मी विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला यायला ६ ते ७ तास लागणार आणि आम्ही १५ मिनिटे देखील थांबू शकत नाही. नंतर अभिनेत्याने व्हिडीओ कॉल लावून देण्याची विनंती केली. पण तिकडे फोनला परवानगी नव्हती. त्यामुळे त्याच्या भावालाही फोन बाहेर ठेवावा लागला होता, असे प्रसादने सांगितले. तो म्हणाला की, भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो.