सिनेमाचे बजेट होते कमी, त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या खर्चाने केल्या 'या' गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:11 PM2020-02-12T17:11:33+5:302020-02-12T17:17:21+5:30
एबी आणि सीडी हा त्यांचा आगामी मराठी सिनेमा असणार आहे. यात विक्रम गोखलेसह ते झळकणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांची बातच न्यारी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या पाच दशकापासून रसिकांना आपल्या अभिनयाने मनोरंजन करणारा हा अभिनेता रोज काही ना काही नवीन रसिकांना काय देता येइल याच गोष्टीचा ध्यास त्यांना असतो. एबी आणि सीडी हा त्यांचा आगामी मराठी सिनेमा असणार आहे. यात विक्रम गोखलेसह ते झळकणार आहेत.
नुकतेच 'एबी आणि सीडी' या मराठी सिनेमाचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ यांची एक खास गोष्ट समोर आली आहे. हे वाचून प्रत्येकाला त्यांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद वाटेल. सगळ्यांना माहिती आहे की, मराठी सिनेमांचे जास्त बजेट नसते. हे लक्षात घेऊन अमिताभ यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पर्सनल वार्डरोबचे ड्रेस परिधान केले. सिनेमाच्या बजेटवर अतिरिक्त भार पडू नये, यासाठी बिग बींनी हा निर्णय घेतला होता.
सिनेमाचा निर्माता अक्षय बर्दापूरकरने जेव्हा बिग बींना त्यांच्या कपड्यांचे मेजरमेंट्ससाठी डिझायनर कधी पाठवायचे, असे विचारले. तेव्हा अमिताभ यांनी मी माझे कपडे स्वत: घेईन. त्या गोष्टीची चिंता नसावी. अगदी सांगितल्याप्रमाणे शूटच्या दिवशी बिग बी 20 जोडी कपडे घेऊन शूटिंग स्थळी पोहचले होते. इतकेच नाही तर त्यांनी या सिनेमाचे डबिंगही स्वतःच केले आहे. 13 मार्चला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.