दिव्यांग दिव्येशची कमाल; अपंगत्वावर मात करत पटकावला सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा राष्ट्रीय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:51 AM2022-07-25T11:51:21+5:302022-07-25T12:01:45+5:30
'सुमी' या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावत बालकलाकार दिव्येश इंदूलकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत: अपंग असूनही त्याने घेतलेली ही गरुडझेप इतर कर्णबधीर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
संजय घावरे
मुंबई: ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकार-तंत्रज्ञांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये 'सुमी' या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावत मुंबईतील दिव्येश इंदूलकर या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. १००% कर्णबधीर असणाऱ्या दिव्येशने गाजवलेला हा पराक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
'सुमी' या चित्रपटातील दोन बालकलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले आहे. दिव्येशसोबतच टायटल रोलमध्ये असलेल्या आकांक्षा पिंगळे हिलाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. अपंगत्वावर मात करत दिव्येशने नॅशनल पटकावल्याने त्याचे यश लक्ष वेधणारे आहे. दादरला राहणारा दिव्येश बालमोहन विद्यामंदिरचा विद्यार्थी आहे. नुकतेच त्याने दहावीच्या परीक्षेत ८८% गुण मिळवले आहेत. दिव्येशची आई स्वाती आणि वडील शैलेंद्र हे दोघेही पूर्णत: मूकबधीर आहेत. त्यांना केवळ साईन लँग्वेज समजते. अशा परिस्थितीत दिव्येशने मिळवलेले यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. दिव्येशच्या यशात त्याची मावशी चित्रा मराठे यांचा मोलाचा वाटा आहे. बालपणापासून दिव्येशला घडवण्याचे काम त्यांनीच केले आहे.
लोकमतशी विशेष संवाद साधताना चित्रा यांनी दिव्येशबाबतची माहिती दिली. चित्रा म्हणाल्या की, दिव्येश हा जन्मत:च कर्णबधीर आहे. हिंदुजा रुग्णालयातील डॅा. किर्तने यांनी दिव्येश दीड वर्षांचा असताना त्याचे कॅाक्लीअर इम्प्लांटचे ऑपरेशन केल्याने उजव्या कानाला श्रवणयंत्र लावून तो ऐकतो. कर्णबधीर मुलांकडे शब्दसंपत्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येतो. दिव्येशचे तसे होऊ नये यासाठी आम्ही त्याला मुलांमध्ये मिसळायला सांगायचो. त्याची शब्दसंपत्ती वाढावी आणि त्याला नीट बोलता यावे यासाठी विद्या पटवर्धन यांच्या अभिनय कार्यशाळेत पाठवले. त्यामुळे त्याला अभिनयाची गोडी लागली. शाळेतील बालनाट्यांमध्ये काम करू लागला. त्याने मराठी मालिकांमध्ये लहान-सहान भूमिका साकारल्या आहेत, पण 'सुमी'मध्ये त्याला मोठा रोल मिळाला. दिव्येशला श्रवणयंत्र लावल्याशिवाय ऐकू येत नसल्याने त्याला मोठी भूमिका मिळेल असे वाटले नव्हते, पण सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक अमोल गोळे यांनी दिव्येशवर विश्वास दाखवत 'सुमी'मध्ये काम करण्याची संधी दिली. 'सुमी'च्या संपूर्ण टिमने खूप सहकार्य केले. दिव्येशला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. आई-वडील आणि तो स्वत: अपंग असूनही त्याने घेतलेली ही गरुडझेप इतर कर्णबधीर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. दिव्येशने मिळवलेले यश त्याच्यासारख्या इतर मुलांसोबत शेअर करून त्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुमीला मदत करणारा चिन्या
'सुमी'मध्ये दिव्येशने चिन्मय उर्फ चिन्या नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलीची कथा यात सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक अमोल गोळेने मांडली आहे. 'नशीबवान'चे दिग्दर्शन करणाऱ्या अमोलने दिग्दर्शित केलेला 'सुमी' हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी अमोललाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने 'सुमी'ने एकूण तीन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
ऋतिक आणि सुबोधचा चाहता...
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिव्येश म्हणाला की, प्रथमच इतका मोठा रोल मिळाला आणि त्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने मिळाल्याने खूप आनंदी आहे. मी अकरावीला कॅामर्स घेणार आहे. शिक्षणासोबतच अॅक्टींगही सुरू ठेवणार आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये अॅक्टींग करायची आहे. भविष्यात नायक साकारण्याचे स्वप्न आहे. मराठीमध्ये मला सुबोध भावे आणि हिंदीमध्ये ऋतिक रोशन आवडतात. अभिनयाचे वेगवेगळे पैलू सादर करता यावेत यासाठी सिनेमे पाहून त्यातील कलाकारांच्या अभिनयाचे बारकाईने निरीक्षण करतो.