‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:30 AM2018-08-21T09:30:04+5:302018-08-22T06:30:00+5:30

स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं, पण प्रत्येक स्वप्नं आपल्या आवाक्यातलं असेलच असं नाही तरीही त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येकाची धडपड असतेच. ही धडपड सुरु असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक मदतीचे हात पुढे सरसावतात

Celebrity come together for fulfill the 'Dreams' | ‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र

‘स्वप्नं’ साकारण्यासाठी ‘दिग्गज’ एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री क्रांती रेडकर यात एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत

स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं, पण प्रत्येक स्वप्नं आपल्या आवाक्यातलं असेलच असं नाही तरीही त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येकाची धडपड असतेच. ही धडपड सुरु असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक मदतीचे हात पुढे सरसावतात. असंच एक ‘स्वप्नं’ साकारण्यासाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्ग्ज एकत्र आले आहेत. वास्तव परिस्थितीची सर्वसामान्यांच्या स्वप्नांशी सांगड घालत सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगारे यांसारख्या दिग्गजांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची आहे.

विजया मेहता आणि राजदत्त यांच्यासारख्या दिग्गजांसोबत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या प्रमोद यांनी आजवर वेगवेगळ्या प्रकारची नाटके दिग्दर्शित केली आहेत. प्रभात काळातले महत्त्वाचे दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्या तालमीत तयार झालेले प्रमोद पवार या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतायेत. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता. ‘कयामत से कयामत तक’ पासून मकरंदचा हिंदी सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास ‘प्रहार’, ‘सर’, ‘सत्या’, ‘फरेब’, ‘मकडी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमांनी सजलेला आहे. यात आता ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. कोणत्याही भूमिकेला अचूक न्याय देण्यास सक्षम असलेली लक्षवेधी अभिनेत्री क्रांती रेडकर यात एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर विविध भाषांच्या सिनेमांमध्ये खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारे मुकेश ऋषी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करणार आहेत.

‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री आदिती पोहनकरनेही या चित्रपटात वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका साकारली आहे. प्रत्येक भूमिका समरस होऊन त्या व्यक्तिरेखेचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता तांबे हिने यात हटके भूमिका साकारली आहे. टी.व्ही. पासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते मनोज जोशी यांची ही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय कलाकार विजय कदम एका वेगळ्या रुपात यात पहायला मिळणार आहेत. मराठीतील अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या जुन्याजाणत्या अभिनेत्री प्रेमाकिरण यांचा ही वेगळा ठसका या चित्रपटात पहायला मिळणार असून खमक्या भूमिकांनी लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री आशा शेलार यांच्याही भूमिकेचे वेगळे रंग यात पहायला मिळणार आहेत. जनार्दन लवंगारे हे मराठी रंगभूमीवरचं हुकमी नाव. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही गोष्टींतून त्यांनी रंगभूमीवर आपला खास प्रेक्षकवर्ग कमावला आहे. त्यांची  ही या चित्रपटात लक्षवेधी भूमिका आहे.

मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.  ‘ट्रकभर स्वप्नं’ २४ ऑगस्ट ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Celebrity come together for fulfill the 'Dreams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.