‘चक दे’ गर्ल आता फुटबॉलपटूच्या भूमिकेत, मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका दाखवणार महिलाशक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:52 AM2019-06-25T11:52:55+5:302019-06-25T11:55:38+5:30
या पोस्टरमध्ये सागरिका फुटबॉलच्या मैदानात उभी आहे. तिने पोपटी रंगाची साडी परिधान केली असून तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत.
अभिनेत्री सागरिका घाडगे पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमनच्या रुपात रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 'चक दे इंडिया' या पदार्पणाच्या चित्रपटात सागरिकाने हॉकीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सागरिकाने साकारलेली भूमिका रसिकांना भावली होती. आता मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबॉल या मराठी चित्रपटातून सागरिका रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच सागरिकाने मान्सून फुटबॉल या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'मान्सून फुटबॉल ' हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे. यातील प्रत्येक महिला जिद्दीच्या जोरावर आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्यामुळेच सागरिकानेही या महिला शक्ती सेलिब्रेट करूया आणि महिला फुटबॉल विश्वचषक २०१९मधील संघाना चीअर करूया तसंच त्यांना खेळताना पाहूया असं या पोस्टरसह सागरिकाने लिहिलं आहे. या पोस्टरमध्ये सागरिका फुटबॉलच्या मैदानात उभी आहे. तिने पोपटी रंगाची साडी परिधान केली असून तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. मान्सून फुटबॉल ही संसार करणाऱ्या महिलांची कथा असून फुटबॉल टीम तयार करण्यासाठी त्या एकत्र येतात. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. सागरिकाचा हा दुसरा मराठी चित्रपट असून प्रेमाची गोष्ट हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. यांत ती अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्यासह ती रुपेरी पडद्यावर झळकली होती.
मान्सून फुटबॉलमध्ये या चित्रपटात सागरिका घाटगे ,विद्या माळवदे , चित्राशी रावत आणि सीमा आझमी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. "मान्सून फुटबॉल"चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्टींना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल ही त्यांची पॅशन असते. या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपण कसे दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात याचे चित्रण या चित्रपटात आहे .