'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके झळकणार 'पांडू' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:08 IST2021-10-30T17:07:03+5:302021-10-30T17:08:00+5:30
'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके झळकणार 'पांडू' चित्रपटात
या वर्षाच्या सुरुवातीला 'पांडू' चित्रपटाची घोषणा झाली आणि तेव्हापासून 'पांडू'च्या भूमिकेत कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र नुकत्याच लाँच झालेल्या या चित्रपटाचा टीझरने 'पांडू' आणि 'महादू'ची जोडी प्रेक्षकांसमोर आणली आहे. भाऊ कदम 'पांडू'च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये.
महाराष्ट्राला विनोदाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो की मराठी चित्रपट, मराठी नाटक असो की मराठी लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचे स्थान कायमच वेगळे आणि अढळ असे राहिलेले आहे. या विनोदी परंपरेला मोठे करण्याचे काम केले आहे इथल्या अनेक विनोदवीरांनी. काळू-बाळूपासून ते अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येते ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचे.
या चित्रपटात 'पांडू' ही मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत भाऊ कदम. या भूमिकेबद्दल भाऊ कदमने सांगितले की, " सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. 'पांडू' प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे."
तर कुशल बद्रिके या चित्रपटाबद्दल सांगितले की,"मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केले आहे.. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेली आहे आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. अशात 'पांडू'सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसते हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे." विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला 'पांडू' येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.