छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलियासारखं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:33 PM2024-09-17T15:33:36+5:302024-09-17T15:34:07+5:30
मला कधीच असं वाटलं नाही की... काय म्हणाल्या छाया कदम?
अभिनेत्री छाया कदम यांनी गेल्या काही महिन्यात अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'सैराट', 'झुंड', 'न्यूड' ते 'लापता लेडीज', 'मडगांव एक्सप्रेस' सारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या 'ऑल वी इमॅजन अॅज लाईट' या सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही स्क्रीनिंग झालं. यासाठी त्यांनी कान्समध्ये हजेरी लावली. यानंतर छाया कदम यांचं खूप कौतुक झालं. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत सौंदर्याची व्याख्या काय सांगितलं. तसंच इंडस्ट्रीत सौंदर्याला किती महत्व असतं याचाही खुलासा केला.
छाया कदम दिसायला सावळी, अजिबातच नाजूक न दिसणारी अभिनेत्री. पण म्हणून त्यांना कोणी यशापासून थांबवलं का? तर अजिबातच नाही. 'मुक्काम पोस्ट मनोरंजन'ला दिलेल्या मुलाखतीत छाया कदम म्हणाल्या, "मला कधीच असं वाटलं नाही की माझे लूक चांगले नाहीत. माझं पहिलं नाटक झुलवा त्यावेळी जे कलाकार होते ते आम्हाी सगळे असेच चेहरे होतो. सरांन फक्त टॅलेंट बघितलं होतं. बाकी आम्ही असेच दिसायला गावातली खरी माणसं. आपण गोरं असायला पाहिजे होतं, पोट आत पाहिजे असं मला वाटलं नाही. आपल्याला माणसांची गोष्ट सांगायची आहे. माणूस दिसणं महत्वाचं आहे. माझ्या जवळचे दिगद्रशक मला हेच सांगतात छाया, तू आहे तशीच राहा. कारण यातूनच तर वैशिष्ट्य दिसतं. सगळ्याच बारीक हिरोईन उभ्या केल्या तर सारख्याच दिसतात असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा माझा उलट प्लस पॉइंट आहे. मी सावळी आहे, अशी आहे हे मला भारी वाटतं. "
"प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारायला पाहिजे. स्वत:वर प्रेम करता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. ती कशी आहे तो कसा आहे हे विचार करुन वेळ घालवण्यापेक्षा मी आहे ती भारी आहे. जगातील सुंदर स्त्री आहे असं बोललं पाहिजे. मी ज्या ज्या लोकांबरोबर काम केलंय जिथे मी अशी चर्चा कधीच ऐकले नाही. मी चांगल्याच माणसांच्या सहवासात राहिले. जर इंडस्ट्रीत तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करायचेत ना तर मग तुम्ही या गोष्टी करा. जसं मला ग्लॅमरस दिसणारी भूमिका आली तर त्या वेळी मी विचार करेन. मग मी दीपिका, आलिया कशा वर्कआऊट करतात दिसण्यावर लक्ष देतात ते करेन. पण इतर वेळी मी या गोष्टींना महत्व देणार नाही."