EXCLUSIVE : स्वैपाक? सॉरी... ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवरून चिन्मय मांडलेकरचे भन्नाट किस्से
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:29 PM2022-04-21T15:29:59+5:302022-04-21T15:35:28+5:30
Masaledaar Kitchen Kallakaar : थेट ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवरून चिन्मयने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. मग काय, किचनमधले एक से एक धम्माल किस्से त्यानं ऐकवले.
‘मसालेदार किचन कल्लाकार’ (Masaledaar Kitchen Kallakaar ) हा शो सध्या चांगलाच गाजतोय. आज रात्री या शोमध्ये एक असा हरहुन्नरी मराठमोळा अभिनेता हजेरी लावणार, ज्याला अजिबात जेवण बनवता येत नाही. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar ) याच्याबद्दल. थेट ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवरून चिन्मयने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. मग काय, किचनमधले एक से एक धम्माल किस्से त्यानं ऐकवले.
‘मसालेदार किचन कल्लाकार’मध्ये तू कसा काय आलास? तुला जेवण बनवता येतं का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर चिन्मय खळखळून हसला. तो म्हणाला, ‘प्रत्येकाला एक गिर्हाईक लागतं आयुष्यात. मी किचन कल्लाकारचा गिर्हाईक आहे, असं मला कळलंय. कारण मला जेव्हा या शोसाठी विचारणा झाली, तेव्हा मी त्यांना अगदी प्रामाणिकपणे खरं खरं सांगितलं. मला काहीच येत नाही, असं मी म्हणालो, पण मग तू परफेक्ट आहेस, असं ते म्हणाले आणि मी होकार दिला. किचनशी माझा संबंध फक्त खाण्यापुरता आहे. स्वैपाकाशी नाही. आता इथे होईल ते होईल.’
आपण स्वत:हून अपघात करायचे नसतात...
तू कधी किचनमध्ये काही ट्राय केलंस का कधी? यावर नाही, अशी प्रामाणिक कबुली त्याने दिली. आपण स्वत:हून अपघात करायचे नसतात. त्यामुळे मी काहीही ट्राय करायच्या फंदात पडलेलो नाहीये. कारण जेव्हा जेव्हा केलंय, ते फार काही बरं झालं नाही. पण मला चहा उत्तम करता येतो. पण इतकंच. त्यापलीकडे काहीही नाही. इथे सीमा संपते, असं तो हसत हसत म्हणाला.
मी मिठाचा चहा बनवतो...
मी वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवतो. मी मिठाचा चहा बनवतो. मी चहात खूप सारे मसाले घालतो. बडीशेप, दालचिनी, गवती चहा असं काय काय मी करत असतो. पण तो चहा सर्वांना आवडतोच असं नाही. पण मला आवडतो. मी प्रयोग आणि चव म्हणून चहा बनवतो. हेल्दी बिल्दी काही नाही. चहात कसलं हेल्दी? मला ग्रीन टी आवडत नाही. मी साधा चहा पितो. त्यात काही गंमत करत राहायची. तेवढंच येतं आपल्याला..., असं ‘चहापुराण’ही त्याने ऐकवलं. आमच्या घरी प्रत्येकाला वेगळावेळा चहा लागतो. मी घरात सगळ्यात आधी उठतो. त्यामुळे मी सर्वांसाठी वेगळा वेगळा चहा बनवतो, असं त्याने सांगितलं.
सुगरण बायका असल्या ना...
सुगरण बायका असल्या ना की त्या बंदी घालतात किचनमध्ये यायला. माझ्या आज्ज्या, मावशा, बायको, माझ्या सासूबाई उत्तम सुगरणी आहेत. त्यामुळे आमच्यावर वेळचं आली नाही कधी. त्यामुळे तुम्ही छान करा, मी सगळं साहित्य आणून देतो. अगदी पार स्वैपाक झाल्यावर किचन आवरून ठेवतो. पण स्वैपाक? सॉरी, ते नाही...,असं सांगत चिन्मय दिलखुलास असतो. मला वेगवेगळ्या लोकांच्या हातचे पदार्थ मला आवडतात. संतोष जुवेकर, अजय पूरकर असे माझे सगळे मित्र खूप छान पदार्थ बनवतात. मी असे मित्र बनवले आहेत, असं तो म्हणाला.