'इंजिनिअर' घडवणार 'प्रेमवारी'चा प्रवास चिन्मय उलगडणार पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 12:35 PM2019-02-01T12:35:31+5:302019-02-01T13:13:27+5:30
प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा 'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
'प्रेमवारी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. एका वेगळ्या आणि अप्रतिम अशा प्रेमाचे रंजक चित्रण आपल्याला या चित्रपट पाहायला मिळणार आहे. अशा या प्रेमाच्या नव्या स्वरूपाचे दर्शन आपल्याला घडवणार आहेत राजेंद्र कचरू गायकवाड. ते निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात या चित्रपटाच्या निमित्ताने पहिले पाऊल टाकत आहेत. माणसाने जर स्वप्नांचा पाठलाग करायचे ठरवले तर तो किती झपाटून काम करतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र कचरू गायकवाड. पेशाने सिव्हील इंजिनिअर असणाऱ्या राजेंद्र गायकवाडांनी त्यांची अभिनयाची आवड जपली आणि याच आवडीतून त्यांनी अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले. अभिनयात रस असल्याने कॉलेजच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिरहीरीने सहभागी होऊन ते त्याची आवड जपण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा कुठेतरी त्यांना वाटायचे की आपण अभिनय क्षेत्रात काहीतरी करावे. परंतु त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे काही काळासाठी आपली आवड बाजूला ठेवली. पण ते त्यांची आवड बदलू शकले नाही. या आवडीतूनच "प्रेमवारी" या चित्रपटाची निर्मिती झाली. पण त्यांच्या स्वप्नातला प्रेमवारी सिनेमात सत्यात उतरवणे अजिबातच सोपे नव्हते. असंख्य अडचणी अनेक आव्हानं त्यांनी पार केली आणि 'प्रेमवारी' सिनेमा बनला. कोणत्याही प्रकारचा अनुभव गाठीशी नसताना फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एवढी मोठी झेप घेतली. या दरम्यान अनेक चांगले वाईट अनुभव त्यांनी घेतले. पण त्यांच्या सोबत सुदैवाने खूप चांगले लोक होते .आणि या प्रवासात त्यांना आणखी चांगले लोक मिळत गेले. या सर्व लोकांमुळेच त्यांचा हा अविस्मरणीय असा प्रवास घडला.
"मी एक इंजिनिअर आहे. पण असे असून देखील मी या सिनेजगतात आलो. याचे कारण म्हणजे माझी या क्षेत्राप्रती असणारी आवड. माझी हीच आवड जपत मी 'प्रेमवारी' या सिनेमाची निर्मिती केली. अगदी सुंदर आणि समर्पक शब्दात या चित्रपटातून प्रेमाबद्दल असणारी एक गोड भावना व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सोबत मी इंजिनीरिंगला असताना घेतलेले स्वानुभव देखील या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. शिवाय एक सामाजिक संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न सुद्धा आम्ही या सिनेमात केला आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून चित्रपट पाहायला जा कारण तुम्ही जगलेली तुमची कॉलेज लाइफ या सिनेमाच्या निमित्याने तुम्हाला पुन्हा जगायला मिळणार आहे." असे मत 'प्रेमवारी' सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते राजेंद्र कचरू गायकवाड यांनी व्यक्त केले.
प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा 'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची प्रस्तुती राजेंद्र कचरू गायकवाड यांचीच आहे. या चित्रपटात चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत