रंग मराठीचा 'कलर'फूल गंध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:19 AM2016-01-16T01:19:04+5:302016-02-06T10:16:34+5:30
एकविसाव्या शतकामध्ये नवनवीन गोष्टींना सातत्याने सामोरे जावे लागते, ती म्हणजे वाढती स्पर्धा. आज कुठल्याही क्षेत्रात गेलो, तरी या स्पर्धेला ...
ए विसाव्या शतकामध्ये नवनवीन गोष्टींना सातत्याने सामोरे जावे लागते, ती म्हणजे वाढती स्पर्धा. आज कुठल्याही क्षेत्रात गेलो, तरी या स्पर्धेला तोंड देणे अटळ आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रवेश केला तेव्हा या स्पर्धेचा सामना करणे हे माझ्यापुढचे सर्वांत मोठे आव्हान होते. पण, एक विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करीत राहिलो. माध्यमाच्या अनेक विभागांमध्ये खूप वर्षे काम केले होते. त्यामुळे तो अनुभव माझ्या पाठीशी होताच. कलर्स हिंदी चॅनेल्सची सेट उभारणी करताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला. ही इंडस्ट्री खरं इतकी मोठी आहे, की आम्ही आमच्या परीने त्यात असंख्य गोष्टींची भर घालत गेलो. आज सांगायला आनंद होतो, की आता प्रेक्षक आणि इंडस्ट्री यामध्ये आम्ही बदल घडवून आणू शकलो. आज प्रेक्षकांचा मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदला आहे. मराठी कलर्समध्ये प्रवेश केल्यानंतर लोकांमध्ये मराठी बोलण्याची आणि समजण्याची क्षमता निर्माण व्हावी, असा आम्ही निकष ठेवला होता. त्यामध्ये अमराठी प्रेक्षक यावर विशेष भर देण्यात आला. जे लोक महाराष्ट्राबाहेर आहेत, पण त्यांची मराठी भाषेशी नाळ तुटू नये, असे त्यांना वाटत आहे. त्यांच्यासाठी बदल घडविण्यात आले. आपल्या राज्याशी ते चॅनेलच्या माध्यमातून का होईना जोडले जावेत. त्यांच्यामध्ये चांगले संस्कारमूल्य निर्माण व्हावेत आणि मराठी बोलावे व समजावे, हाच उद्देश होता. कलर्सच्या प्रेक्षकांच्या आमच्याकडून दर्जेदार मालिका, कार्यक्रम आणि निखळ मनोरंजन व्हावे, इतकीच अपेक्षा असल्याने त्याची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि करीत आहोत. यामध्ये अगदी संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित 'तुकाराम' मालिकेपासून युवकांसाठी रोमॅन्टिक मालिका अशा कार्यक्रमांचा उल्लेख करावा लागेल.आमच्या प्रेक्षकांसाठी काही नवीन मानके प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यापूर्वी असा प्रयत्न कधीही कुणीही केला नसेल. पौराणिक शो 'गणपती बाप्पा मोरया'पासून ते कॉमेडीची बुलेट ट्रेन, आगामी शो 'आली लहर केला कहर' या मालिकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे अल्पावधीतच आम्ही यशस्वीतेची शिखरे पादाक्रांत करू शकलो. केवळ रेटिंगमध्ये झालेल्या वाढीमुळेच नव्हे, तर प्रेक्षकांना जे हवे आहे ते देण्यात आम्ही यशस्वी झाल्याने मराठी इंडस्ट्री आमच्याकडे आशादायी नजरेतून पाहत आहे. भाषेला सीमेचे बंधन नसते, असे म्हटले जाते. पण, सगळ्याच भाषांमधील चित्रपटसृष्टीसह विविध वृत्तवाहिन्यांमधील विभागलेल्या प्रेक्षकांच्या प्रत्ययावरून तरी यामध्ये काहीसा विरोधाभास जाणवतो. इतर भाषांमधील मालिका किंवा कार्यक्रमांपेक्षा आपल्या मातृभाषेमधल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी पसंती देणेदेखील तितकेच स्वाभाविकच आहे. पण, याचाच फटका बाहेरगावी नोकरीनिमित्त स्थिरावलेल्या व्यक्तींना बसतो आणि आपल्या माती आणि भाषेपासून त्यांना दूर गेल्याची खंत जाणवते. नेमकी हीच गरज ओळखून वायकॉम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या रिजनल चॅनेल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अनुज पोद्दार यांनी 'कलर्स मराठी आणि कलर्स गुजराथी' या दोन चॅनेल्सची निर्मिती केली आहे. जे लोक मराठी जाणतात, पण त्यांना बोलता येत नाही, अशा प्रेक्षकवर्गाला समोर ठेवून त्यांच्या जीवनात मनोरंजन आणि पारंपरिक मूल्य जोपासणे हे एकच उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. 'रंग मराठी, गंध मराठी' या टॅगलाईनमधून त्यांनी प्रेक्षकांना जोडले आहे. या चॅनेल्सच्या निर्मिती आणि स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचा पट त्यांनी 'सीएनएक्स'च्या वाचकांशी बोलताना उलगडला.