भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:39 IST2022-03-28T19:38:36+5:302022-03-28T19:39:25+5:30
'कम्फर्ट नात्यांचा'च्या निमित्ताने प्रथमच पहायला मिळणार यशोमान आपटे, मयूरी देशमुख, सुयश टिळक, निवेदीता सराफ आणि भरत जाधवचे अफलातून समीकरण.

भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला
काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरते. गुढीपाडव्या निमित्त अशाच नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा कॉटनकिंगच्या सहाय्याने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अद्भुत क्रिएटीव्हजच्या मोनिका धारणकर लिखित आणि वैभव पंडित दिग्दर्शित ''कम्फर्ट नात्यांचा" कॅाटन आणि नात्यांची सांगड घालत एक महत्त्वपूर्ण मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.
कुटुंबातील नातेसंबंधात बाप लेकीच्या नात्याची बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा 'कम्फर्ट नात्यांचा'' या लघुपटात सांगण्यात आली आहे.मुलीसोबत आलेलं नवं नातं स्वीकार करताना वडीलांच्या मनातील भाव अत्यंत सुरेखपणे सादर करण्यात आले आहेत. दोन पिढ्यांमधला फरक विनोदी ढंगात मांडून इतर नात्यांचे पदर अलगद उलगडले आहेत. या लघुपटाच्या निमित्तानं भरत जाधव आणि निवेदिता सराफ ही जोडी एकत्र आली आहे. इतकंच नाही तर सगळ्यांची लाडकी मयूरी देशमुख ही पण या लघुपटाचे आकर्षण आहे. भरत जाधव यांनी धमाल केली आहे तर निवेदीता यांनी सहज अभिनयाची छाप सोडली आहे.
या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमन आपटे, मयूरी देशमुख सुयश टिळक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली आहे. 'मद्रास कॅफे', 'लुका छिपी' या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणारे मिलिंद जोग या लघुपटाचे डिओपी आहेत.