‘एक वंचित’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 08:24 AM2018-02-12T08:24:33+5:302018-02-12T13:54:33+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर तसंच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. अशा चित्रपटांमध्ये मोठे स्टार नसले ...

Completing the film of 'One Disadvantaged' | ‘एक वंचित’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

‘एक वंचित’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

googlenewsNext
ाठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर तसंच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. अशा चित्रपटांमध्ये मोठे स्टार नसले तरी त्याचं कथानक आणि आशयच खरा  हिरो ठरत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. असे चित्रपट केवळ प्रेक्षकांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत नाहीत, तर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील  चित्रपट महोत्सवांमध्येही मराठीचा डंका वाजवतात. याच पठडीत मोडणाऱ्या  ‘एक वंचित’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे.  व्हिजीओ 9 प्रॉडक्शनच्या बेनरखाली तयार होणाऱ्या निर्माते मनोज के. एम्. निर्मित ‘एक वंचित’ या चित्रपटाचं चित्रीकरण मागील काही दिवसांपासून पालघर आणि विटा या भागांमध्ये सुरू होतं. पालघर-विटामधील विविध लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. दिग्दर्शक रवीसुमन यांनी या चित्रपटात एका दुर्बल कुटुंबाची कथा मांडली आहे. आजही समाजातील दुर्बल घटक वंचिताप्रमाणे जीवन जगत आहेत. इच्छा  असूनही ते उंच भरारी घेऊन शकत नाहीत. कायम शोषितांचं जीणंच यांच्या नशीबी असतं. हेच विदारक चित्र या  चित्रपटात दिग्दर्शक रवीसुमन यांनी मोठया तळमळीने सादर केलं आहे. हे चित्र रेखाटण्याच्या कामी रिअल लोकेशन्सनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं रवीसुमन यांचं म्हणणं आहे. ‘एक वंचित’च्या कथानकाला न्याय देता  यावा यासाठी आजवर कधीही रूपेरी पडद्यावर न दिसलेली लोकेशन्स निवडण्यात आली. कॆमेराच्या माध्यमातून ती कथेत गोवताना एखाद्या व्यक्तिरेखेप्रमाणे भासतील याची काळजी घेण्यात आल्याचंही रवीसुमन मानतात. या कामी केमेरामन आणि कला दिग्दर्शकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असल्याचं रवीसुमन यांचं मत आहे. रवीसुमन यांनी चौफेर कामगिरी करीत दिग्दर्शनासोबतच ‘एक वंचित’ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखनही केलं आहे. हा चित्रपट आजच्या काळातील समाजाच्या अंधाळया कोपऱ्यावर प्रकाश टाकणारा असल्याचं चित्रपटाचे निर्माते मनोज के. एम्. सांगतात. समाजातील दुर्बल घटकांच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम करतानाच वाईट प्रवृत्तींवर प्रहार करण्याचा प्रयत्नही या चित्रपटात करण्यात आला आहे. समाजातील दबलेल्या घटकांचा आवाज या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणयात आल्याचंही निर्माते सांगतात. या चित्रपटात माधवी जुवेकर, राजेंद्र जाधव, रामचंद्र धुमाळ, जयराज नायर, याकुब सय्यद, विनया तळेकर, संदिप रेडकर, सुप्रिया गावकर, प्रफुल बनकर, श्रीजा भिसे, उमेश बोलके, विकास थोरात, अनिल गावडे,
शुभांगी शिंदे आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. संगीतकार विशाल बोरूलकर यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधुर संगीत दिलं असून कोरिओग्राफी चिराग भारती झवेरी यांनी केली आहे. या चित्रपटातील एक गीत बॉलिवूडमधील आघाडीचा गायक असलेल्या जावेद अलीच्या आवाजात ध्वनीमद्रित करण्यात आलं आहे. या जोडीला नंदेश उमप यांनीही या चित्रपटासाठी गायन केलं आहे. केमेरामन संतोष हंकारे या चित्रपटाचे छायालेखक असून गजानन फुलारी कला दिग्दर्शक आहेत. दीपक दीक्षित यांनी रंगभूषा केली असून, धनश्री साळेकर यांची वेशभूषा आहे. गिरीशकुमार तवाडीया या चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिस आहेत, तर निलेश गमरे प्रॉडक्शन मेनेजर आहेत. जीवन कुंभार आणि कृष्णा शेलार हे या चित्रपटाचे कार्यकरी निर्माते आहेत. ‘एक वंचित’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम वेगात सुरू आहे. 

Web Title: Completing the film of 'One Disadvantaged'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.