CoronaVirus:मराठमोळा हा अभिनेता कोरोनाग्रस्तांसाठी बनला देवदूत, दिवसरात्र करतोय रुग्णांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:41 PM2020-04-08T14:41:17+5:302020-04-08T14:41:56+5:30
मराठी व हिंदी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता पेशाने आहे डॉक्टर
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे. यातील हजारपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातल्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन निर्णय घेतला. मात्र रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन, पोलीस व डॉक्टर सातत्याने झटत आहेत. सध्याचे हे संकट पाहून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आशिष गोखले देखील रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र कार्यरत आहे.
अभिनेता आशिष गोखले हा पेशाने डॉक्टर असून कोरोनाचे देशावरील संकट पाहून दिवस रात्र रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्याच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
सध्या दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत असलेला आशिष अॅक्टिंगला खूप मिस करतोय हे त्याने इंस्टाग्रामवर सांगितले आहे. तो म्हणाला की, बऱ्याच कालावधीपासून मी अभिनयापासून दूर आहे आणि पूर्णपणे डॉक्टरच्या क्षेत्रात उतरलो आहे. ही काळाची गरज आहे. माझ्यातील कलाकाराला खूप मिस करतो आहे. तर क्वॉरंटाईनच्या आधीचा फोटो शेअर करत आहे. हे संकट लवकर संपेल अशी आशा आहे. तोपर्यंत घरी थांबा, सुरक्षित रहा.
अभिनेता डॉ. आशिष गोखले याने वैद्यकिय शिक्षण घेतलं आहे. आपल्या मेडिकलचे प्रोफेशन सांभाळत आशिषने त्याचा अभिनयाचा छंदही जोपासला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली कठिण परिस्थिती लक्षात घेता सध्या आशिष त्याचा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत घालवत आहे.
आशिष गोखलेने गब्बर इज बॅक, लव्ह यू फॅमिली सारखे हिंदी चित्रपट, कंडिशन्स अप्लाय, बाला, रेडी मिक्स, मोगरा फुलला सारखे मराठी चित्रपट तसेच अनेक हिंदी मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. सोनी एण्टरटेन्मेट वाहिनीवरील 'तारा फ्रॉम सातारा' या मालिकेतील वरुण माने ही भूमिका त्याने साकारली होती.