CoronaVirus: अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी बदडले तर काय चुकले - नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 03:52 PM2020-04-06T15:52:30+5:302020-04-06T15:53:29+5:30
नाना पाटेकर यांनी लोकांना हात जोडून घराबाहेर पडू नका असे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले आणि सर्वांना घरातच थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील कित्येक जण याकडे गांभीर्याने न पाहता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलीस बदडत आहेत. त्यात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील लोकांना हात जोडून घराबाहेर पडू नका असे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. इतकेच नाही तर त्यांनी अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी बदडले तर काय चुकले असेही म्हटले आहे.
नाना पाटेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ते या व्हिडिओत म्हणाले की, सरकारने आमच्यावर जे निर्बंध घातले आहेत ते कशासाठी व कोणासाठी घातले आहेत. आमच्याच भल्यासाठी आहेत ना. सगळं अर्थकारण थांबले आहे. आपण बाहेर जात नसल्यामुळे सगळं ठप्प आहे. याचा सरकारला काही फायदा आहे का ? बर त्याच कारण आपल्याला माहित नाही का ? सगळं माहित असतानासुद्धा रस्त्यावर उतरतो एक कुतूहुल म्हणून... काय चाललंय उगाच मोटरसायकल काढतो खोटीनाटी कारण सांगून निदान काय चाललंय हे पाहून येतो हाकिती मुर्खपणा आहे . हे करत असताना मी केवळ माझा जीव धोक्यात घालत नाही आहे. स्वतःसोबत तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घालतो आहे. माझा, मुलांचा बायकोचा, मित्रांचा व शेजारच्यांचा सगळ्यांना वेठीस धरतो आहे आणि कशापोटी. तुम्ही घरी बसला आहात आणि मी रस्त्यावर आलोय, हा मोठेपणा करुन दाखवण्यासाठी. मग माझ्या पोलिसांनी दोन लाठ्या चढवल्या तर काय चुकलं त्यांचं.
ते पुढे म्हणाले की,पोलीसदेखील माणसं आहेत त्यांना नाही का हा रोग होऊ शकत. सकाळी उठल्यापासून ते घराबाहेर आहेत. 24 तासांहून जास्त वेळ ते ड्युटी करत आहेत. पोलिस, डॉक्टर व शासकीय यंत्रणेमधील माणसं काय काय करत आहेत, त्यांचे पाय धरायला पाहिजे आपण. त्यांना मदत करायला पाहिजे आपण. किती संसरगजन्य रोग आहे हा, बाहेर जात आहात तुम्ही मग तुमच्यामुळे पहिले बाधित कोण होईल, आई, मुलं व भावंड पहिले जातील, मग शेजारचे जातील. मग गल्ली जाईल, राज्य जाईल, देश जाईल आम्हाला काहीच नाही त्याचं.इतके निर्लज्ज आहोत का आम्ही. मला मरायचं तर मी मरेनना दुसऱ्याचा जीव का घ्यायचा. तसं इथे होत नाही. इथे माझ्यासोबत सगळ्यांनाच वेठीस धरतो आहे. कधी कळणार आम्हाला हे, गंमत चालली आहे. पोलिसांना किती वैफल्य येत असेल इतकं करूनही लोक ऐकत नाही म्हटल्यावर. याचा परिणाम अतिशय वाईट असेल.
स्मशानात जाळायला लाकडं नसतील मग. मुळात अशा व्यक्तीला मेल्यानंतर तुम्हाला भेटताही येत नाही. परस्पर जाळलं जातं. कसं जगायचं हे तुम्ही ठरवा. म्हणजे तुमच्या नशीबी असं मरण येणार नाही. नको का आता एकमेकांना सांभाळायला. जात नाही पंथ नाही श्रीमंत नाही की गरीब नाही... हा आजार सगळ्यांना होतो. या क्षणी तरी आपण सगळे समान आहोत. एकदा हात जोडून सांगतो की बाहेर पडू नका.