अनुजा ठरली 'दादा एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:18 PM2018-12-18T18:18:52+5:302018-12-18T18:22:54+5:30
बहीण भावाच्या नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
बहीण भावाच्या नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन नाटकाशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते. ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचे नाव आता जाहीर करण्यात आले आहे. अनुजा चव्हाण ही ह्या स्पर्धेची भाग्यशाली विजेता ठरली असून ह्या नाटकाची ती पहिली प्रेक्षक देखील ठरली आहे.
अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. अनुजाला दादा, एक गुड न्युज आहे या नाटकाचे तिकीट ह्या नाटकातील कलाकार दस्तुरखुद्द उमेश कामात, ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक अद्वैत दादरकर, लेखिका कल्याणी पाठारे आणि ह्या नाटकाची सादरकर्ती प्रिया बापट यांच्या हस्ते देण्यात आले.
नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवंकोरं नाटक "दादा,एक गुड न्युज आहे." नुकतेच ह्या नाटकाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट वर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.