चिक्कार पैसा, अमाप प्रॉपर्टी., तरीही आयुष्यभर एकटे राहिले दादा कोंडके; जगाला हसवणाऱ्या दादांचं पडद्यामागचं दुःख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:21 IST2023-08-08T13:17:56+5:302023-08-08T13:21:42+5:30
Dada Kondke :आयुष्यातला एकाकीपणा त्यांना छळत होता. त्यांनी कधीही तो जगापुढे दिसू दिला नाही

चिक्कार पैसा, अमाप प्रॉपर्टी., तरीही आयुष्यभर एकटे राहिले दादा कोंडके; जगाला हसवणाऱ्या दादांचं पडद्यामागचं दुःख
७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. मराठी चित्रपटसृष्टीचे सुपस्टार असलेल्या या दिग्गज अभिनेत्याचा आज (८ ऑगस्ट) वाढदिवस. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. मुंबईच्या नायगाव येथील एका मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. सिनेसृष्टीत ते दादा नावाने प्रसिद्ध झाले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले.
हस-या या चेह-यामागे, खूपसं दु:ख दडलेलं असतं, असं म्हणतात ना. दादांबद्दलही तेच होतं. आयुष्यातला एकाकीपणा त्यांना छळत होता. त्यांनी कधीही तो जगापुढे दिसू दिला नाही. मात्र ‘एकटा जीव’ या त्यांच्या चरित्राच्या शेवटच्या पानावरून मात्र त्यांचा हा ‘एकटेपणा’ पहिल्यांदा जगापुढे आला.‘एकटा जीव’ (Ekta Jeev) या पुस्तकात दादा कोंडके यांनी आयुष्यातील अनेक गोष्टी खुलासा केला आहे. आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला गेलेला आहे. परंतु चरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिलेले दादांचे शब्द खूपच बोलके आहेत.
काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये...
आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दु:ख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे,’ असं दादांनी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलं आहं.