दादा कोंडके यांचं झालं होतं लग्न, पण ४ वर्षांतच मोडला संसार, घेतला घटस्फोट; कोण होती ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 04:47 PM2024-06-15T16:47:33+5:302024-06-15T16:48:53+5:30
अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हते. दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातले अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादाचं लग्न.
अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हते. दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातले अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादाचं लग्न. फार कमी लोकांना माहित असेल की दादांचं नलीनी नावाच्या एका स्त्रीसोबत लग्न झाले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
जसजसे दादा तारुण्यात प्रवेश करत होते दादांच्या टवाळक्या, उचापत्या वाढत चालल्या होत्या. ज्याची दादांच्या मोठ्या भावाला फार काळजी वाटत होती. दादांचं लग्न लावून दिल तर दादा लाइनवर येईल अशी त्यांना आशा वाटत होती. दादा मात्र लग्नाला अजिबात तयार नव्हते. पुढे जाऊन दादा 'मुंबई कामगार' मधल्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरावले. सर्व उत्तम चालू आहे हे पाहून मोठ्या भावाने पुन्हा एकदा दादांच्या लग्नाचे प्रयत्न सुरू केले.
दादांच्या फार काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या
दादांकडे लग्नासाठी इतका तगदा लावला होता की शेवटी कंटाळून त्यांनी लग्न करायला होकार दिला. मोठ्या भावाने दादांसाठी एक स्थळ शोधलं, मुलीचं नाव नलिनी असे होते. नलिनी गरीब घरची मुलगी होती. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. दादांच्या फार काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या. आत्मचरित्रात दादा म्हणाले की, मोठ्या अपेक्षा करताना स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. मी रूपवान नव्हतो. शिवाय नोकरीही बेताची होती. त्यामुळे पहिल्याच झटक्यात मी नलिनीला होकार दिला.
लग्नानंतरही दादा एकटेच मुंबईला राहू लागले
दादा आणि नलिनी यांचे १९६४ मध्ये इंगवली लग्न झाले. मुंबईत दादांचे स्वतःचे घर नव्हते. ते एका मित्राच्या खोलीत राहत होते. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही दादा एकटेच मुंबईला राहू लागले . नलिनी, वहिनी व मोठ्या भावासोबत इंगवलीला राहत होती. १९६५ साल उजाडले आणि त्याबरोबर दादांचं नशीबसुद्धा. या वर्षात दादांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य सुरू झाले आणि जोरदार प्रयोग चालू लागले होते. चार पैसे मिळू लागले म्हणून परळ भागातच दादांनी स्वतःची एक खोली घेतली आणि नलिनीला मुंबईला घेऊन आले. 'विच्छा माझी पुरी करा'ला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं की, त्यांचे सारखे बाहेरगावी प्रयोग होऊ लागले. प्रयोगाच्या निमित्ताने दादा महिना महिनाभर बाहेर राहू लागले होते. अशावेळी घरात नलिनी एकटीच असायची. मात्र या काळात अशा काही अनेक विचित्र गोष्टी घडल्या, ज्यांचा उल्लेख दादांनी आपल्या आत्मचरित्रात टाळला.
अखेर दादांनी घेतला घटस्फोट
अखेर दादांनी नलिनीपासून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आणि नलिनीला तिच्या माहेरी पाठवून दिले. १९६८ मध्ये दादांनी नलिनीने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यावेळी नलिनीने मागितल्याप्रमाणे दादांनी तिला ४० हजार रुपये पोटगी दिली. अवघ्या चार वर्षात दादांच्या संसाराचा खेळखंडोबा झाला.