दगडू उर्फ प्रथमेश परब म्हणतो, 'आपला हात जगन्नाथ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:15 AM2019-05-31T07:15:00+5:302019-05-31T07:15:00+5:30
'टाईमपास' फेम प्रथमेश परब लवकरच 'टकाटक' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
'टाईमपास' फेम प्रथमेश परब लवकरच 'टकाटक' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. आपला हात जग्गनाथ असे या गाण्याचे बोल असून यात एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'टकाटक' या चित्रपटात टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, त्याची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जुळली आहे. आपला हात जगन्नाथ गाण्याला आनंद शिंदेने स्वरसाज दिला असून हे गीत जय अत्रे यांनी लिहिले आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. हे गाणे प्रथमेश आणि रितिका यांच्यावर चित्रीत करण्यात आल्याने त्याच्या केमिस्ट्रीचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येईल.
पदार्पणातील चित्रपट असूनही रितिकाने दणाकेबाज अभिनय करत प्रथमेशला उत्स्फूर्त साथ दिल्याचे ‘टकाटक’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
एखाद्या गमतीशीर कथानकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे ही मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शर्नाची शैली आहे. त्यांचे यापूर्वीचे चित्रपट याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. या चित्रपटात मिलिंद कवडे यांना ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग,अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांची साथ लाभली आहे.
चित्रपटाचा जॉनर जरी सेक्स कॉमेडी प्रकारात मोडणारा असला तरी कुठेही थिल्लरपणा किंवा वाह्यातपणा जाणवणार नाही याची पुरेपूर काळजी निर्माता-दिग्दर्शकांनी घेतल्याने ‘टकाटक’च्या रूपात एक मनोरंजक चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांना मिळेल. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे,प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. हजरथ शेख (वली) यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे.