'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:33 IST2023-09-11T16:32:28+5:302023-09-11T16:33:07+5:30
Adinath Kothare : प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे.

'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक
आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करीत अभिनेता आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कबीर खानच्या '83' मध्ये रणवीर सिंग सोबत दिलीप वेंगसरकर यांची भूमिका, नागेश कुकुनूरच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये महेश आरवले, प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा हा रॅपर स्वॅग जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेबसीरिजमधला आहे. ही वेबसिरीज नुकतीच जिओ सिनेमावर दाखल झाली आहे. ‘बजाव’ या वेबसीरिजमध्ये ‘ओजी’ या दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप असलेली भूमिका त्याने साकारली आहे.
आजवर सोज्वळ धाटणीच्या भूमिका करणाऱ्या आदिनाथसाठी हा एक चॅलेजिंग रोल असल्याचे तो सांगतो. आपल्या भूमिकेविषयी आदिनाथ सांगतो, ‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला पहिल्यांदाच ‘बजाव’ मुळे करता आली. मी पक्का मुंबईकर आहे. या भूमिकेसाठी दिल्लीच्या भाषेचा लहेजा आत्मसात करणे आणि रॅपरचा स्वॅग अंगात भिनवणे माझ्यासाठी खूप चॅलेजिंग होतं. खूप मजामस्ती आणि धमाल आणणारी ही वेबसीरिज आहे. नकारात्मक धाटणीच्या या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली, ही सीरिज माझ्यासाठी विशेष आहे कारण, आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन वेगळं करायला मिळाल्याचं समाधान ‘बजाव’ने दिल्याचं आदिनाथ सांगतो.
बॉडी लँग्वेज पासून ते अगदी शिव्यांचा ‘रिदम फ्लो’ कसा असायला हवा? या सगळया गोष्टी आदिनाथने स्वतः:मध्ये बारकाईने भिनवत हा दिल्लीयेट ‘ओजी’ रॅपर साकारला आहे. या भूमिकेविषयी मी साशंक होतो पण जिओ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड तेजकरण सिंग यांनी मला विश्वास दिला की, ही भूमिका मी करू शकतो. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी रफ्तार सोबत ‘फेस ऑफ मुव्हमेंट’ होती. माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझी मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही भूमिका चांगल्या प्रकारे करू शकलो’. एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करतानाच, वेबसिरीजला मिळत असलेला प्रतिसाद आणि माझ्या भूमिकेचं होत असलेलं कौतुक नक्कीच प्रोत्साहन देणारं आहे.