'दे धक्का १'ला लग्न झालं नवं पर्व सुरू झालं अन् आता..., सिद्धार्थ जाधवचे विधान आलं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:00 AM2022-07-22T07:00:00+5:302022-07-22T07:00:00+5:30
Siddharth Jadhav: 'दे धक्का २'मध्ये पुन्हा एकदा धनाजी साकारण्यासाठी सिद्धार्थ जाधव खूप उत्सुक आहे.
‘दे धक्का’ (De Dhakka ) हा सिनेमा २००८ साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. एका क्रेझी कुटुंबाची कथा पाहताना प्रेक्षक बेभान झाले होते. ‘दे धक्का’ला मिळालेल्या प्रतिसादानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का 2’ चित्रपट भेटीला येतो आहे. दे धक्का चित्रपटात धनाजीची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारली होती. पुन्हा एकदा धनाजी साकारण्यासाठी सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) खूप उत्सुक आहे. नुकतेच त्याने दे धक्का २च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्याने केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सिद्धार्थ जाधव हिने लोकमतशी बोलताना सांगितले की, पुन्हा एकदा १४ वर्षांनी धनाजी साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. २००८ ला दे धक्का हा चित्रपट आला होता. त्यानंतर १४ वर्षानंतर चित्रपट चित्रीत होऊन आता हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे. तब्बल १४ वर्षांनंतर मी पुन्हा धनाजीची भूमिका करतो आहे.
तो पुढे म्हणाला की, माझ्यासाठी ही भूमिका खूपच खास आहे. या भूमिकेनं माझे आयुष्य बदलले आहे. तसेच महेश सरांनी आणि दे धक्काने माझे आयुष्य बदललं होतं. त्यामुळे आता जास्त उत्सुकता आहे. दे धक्का शूट करत असताना माझे लग्न झाले आणि माझ्या आयुष्यातील वेगळ्या पर्वाला सुरूवात झाली होती. निश्चितच दे धक्का पुन्हा अशा एका वळणावर येतो आहे की कदाचित माझ्या आयुष्यातील वेगळ्या पर्वाला सुरूवात होऊ शकते.
दे धक्का 2 मध्ये पहिल्या दे धक्का प्रमाणेच स्टारकास्ट आहे . शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि सिक्वेलमध्ये संजय खापरे, गौरी इंगवले, प्रवीण विठ्ठल तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरे असे बरेच कलाकार या चित्रपटात आहेत . दे धक्का चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार या चित्रपटातही दिसणार आहेत.