दे धक्का-२: निखळ मनोरंजन, इमोशन अन् लंडनवारी...एकदम OK!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:40 AM2022-08-05T11:40:32+5:302022-08-05T11:41:22+5:30
२००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं.
मोरेश्वर, महेश, देवेश
२००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. कथा भावली आणि प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता १३ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वल भेटीला येतोय. या निमित्तानं 'दे धक्का-२' च्या टीमसोबत 'लोकमत'सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सिनेमाशी निगडीत आठवणी, गमतीजमती आणि अनुभव कथन केला.
प्रश्न: दे धक्का'च्या यशानंतर 'सिक्वल'कडून प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होतं का?
मकरंद अनासपुरे- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना याबाबतचं श्रेय आहे. कारण ते कुठलाही धोका पत्करू शकतात. सिक्वल म्हटलं की रिस्क आलीच. पण महेश मांजरेकरांची आमची मीटिंग घेतली आणि पहिलंच स्पष्ट केलं की 'दे धक्का' नावाचा चित्रपटच आपण केलेला नाही अशा मानसिकतेनं काम केलं तरच हा चित्रपट होईल. नाहीतर जागोजागी तुम्हाला आठवणी येत राहणार. तीही एक कॉन्सेप्ट होती जी लोकांना आवडली आणि आता ही पण एक कॉन्सेप्ट आहे आणि ही लोकांना आवडेल यावर विश्वास ठेवून आपण काम केलं तरच ती लोकांपर्यंत पोहोचेल. हे चित्र आम्हाला पहिल्याच दिवशी स्पष्ट करुन सांगितलं गेलं. म्हणूनच आम्ही पहिल्या दिवशी 'दे धक्का' पुसला आणि दुसऱ्या दिवशी 'दे-धक्का २' सुरू केला. अपेक्षांचं ओझं घेऊन आपण काम केलं तर काहीच चालणार नाही. पण आम्हाला खात्री आहे की १४ वर्ष झाली असली तरी लोकांना 'दे धक्का-२' आवडेल.
प्रश्न: हिंदीतले 'सिक्वल' आणि मराठीतले 'सिक्वल' याकडे तू कसं पाहातोस?
सिद्धार्थ जाधव- 'गोलमाल'चे खूप सिक्वल आले. 'सिंघम'चेही आले. पण 'दे धक्का'चा 'सिक्वल' माझ्यासाठी जवळचा आहे. कारण हे एक कुटुंबच आहे. यातलं कुठलंही पात्र नवीन नाहीय. तेच कुटुंब गावावरुन मुंबईला येतं. आता तेच कुटुंब मुंबईहून लंडनला जातं. तर ती यात गंमत आहे. माझ्या करिअरमध्ये अॅक्शन, रोमँटीक, कॉमेडी फिल्म झाली. खलनायक भूमिकाही केली. पण सिक्वल हा प्रकार माझ्या करिअरमध्ये आला नव्हता. 'दे धक्का'चा सिक्वल येईल असं वाटलं नव्हतं. पण तो झाला याचा खूप आनंद आहे. 'दे धक्का-२'मध्ये तुम्ही 'दे-धक्का' शोधायला गेलात तर त्यात मजा नाही. 'दे धक्का' थांबलाय म्हणून तर 'दे-धक्का २' सुरू झाला आहे. पुढे काय घडलंय ते सांगणारा 'दे-धक्का २' आहे.
प्रश्न: चित्रपटात काय झाडी, काय डोंगार डायलॉग कसा अॅड झाला?
शिवाजी साटम- डायलॉग अचानक अॅड झालेला नाही. आम्ही शूट करत असलेलं लंडनमधील लोकेशनच तसं होतं. त्यामुळे स्क्रीप्टच्या गरजेनुसार तो अगोदरच घेतलेला डायलॉग आहे. महेश मांजरेकर गंमतीने म्हणतात शहाजाबापूंनीच आमचं पाहून तो डायलॉग घेतला. पण तुम्ही नीट बघा माझं कॅरेक्टरही तसंच ग्रामीण भागातलं आहे. त्यामुळे आपसूकच तो संवाद तोंडातून आणि मनातून बाहेर येतो.
प्रश्न: दिग्गज कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? लंडनमध्ये शूटिंग करताना कसं वाटलं?
गौरी- 'दे धक्का २' च्या निमित्तानं मला जाधव कुटुंबाचा भाग होता आलं यासाठी मी स्वतःला लकी समजते. दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळालं. महेश मांजरेकरांसोबत काम करायला तर सगळ्यांना आवडतं. लंडनमध्ये लावणी करताना छान वाटलं. कारण माझ्यासमोर लंडनच्या स्ट्रीटवर वेस्टर्न डान्स करणारे कलाकार होते. तिथे लावणी करताना मला रिस्पेक्ट मिळत होता. दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दडपण जाणवंल नाही, कारण त्यांनी मला सांभाळून घेतलं. आम्ही एक फॅमिली आहोत आणि त्याच सगळ्यांनी लंडनला जाऊन काम केलं.
मेधा मांजरेकर- 'दे धक्का २' बघताना पहिल्या भागाचा नॉस्टेल्जिया नक्कीच जाणवेल. 'दे धक्का' आणि आताचा 'दे धक्का २' यामध्ये फॅमिली तीच आहे. सिद्धार्थचा आजार असेल किंवा अन्य गोष्टी त्यात फारसा बदल झालेला नाही. आपल्यावर आलेलं संकट किंवा प्रॉब्लेम काहीही जुगाड करून ते सोडवतात. दे धक्काचा सिक्वल पाहताना आधीच्या दे धक्का सिनेमाचा नॉस्टेल्जिया नक्कीच जाणवेल आणि म्हणूनच प्रेक्षकांना तो अधिक आपलासा वाटेल. रिस्क असली तरी आनंद पूरेपूर मिळेल. काकस्पर्श, नटसम्राट यातील भूमिका वेगळ्या होत्या आणि दे धक्का २ मधील भूमिका वेगळी आहे. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून न पडता महेश जिथे सांगेल तिथं जाऊन बसायचं.
प्रश्न: कोरोनामुळे ओटीटी अन् डिजिटल युगात दुरावलेला प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येईल का?
मकरंद अनासपुरे- 'दे धक्का 2' सिनेमासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतील असं केवळ वाटतच नाही, तर तशी खात्री आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमे हे घरात एकट्यानं किंवा दरवाजा बंद करुन गुपचूप पाहावे लागतात. पण, दे धक्का हा सिनेमा सहकुटुंब सहपरिवार पाहायचा आहे. आजोबाच्या मांडीवर बसलेल्या नातवासहं चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी या सिनेमाला दिसून येईल. कारण, लोकांनी 'दे धक्का'वर तेवढं प्रेम केलंय.