दिपाली सय्यद यांची नवी इनिंग! साईबाबांच्या शिर्डीत सुरू केलं नवं हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:52 IST2025-01-13T14:49:30+5:302025-01-13T14:52:30+5:30
दिपाली सय्यद यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण करत नवं हॉटेलच सुरू केलं. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत त्यांनी त्यांचं हे हॉटेल सुरू केलं आहे.

दिपाली सय्यद यांची नवी इनिंग! साईबाबांच्या शिर्डीत सुरू केलं नवं हॉटेल
अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद अभिनयाबरोबरच राजकारणातही सक्रिय आहेत. हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेत असलेल्या दिपाली सय्यद यांनी नुकतंच नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचं नवं हॉटेल सुरू केलं आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी गोड बातम्या दिल्या. कुणी नव्या घरात गृहप्रवेश केला तर कोणी गाडी घेतली. पण, दिपाली सय्यद यांनी मात्र हॉटेल व्यवसायात पदार्पण करत नवं हॉटेलच सुरू केलं. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत त्यांनी त्यांचं हे हॉटेल सुरू केलं आहे. दिपाली यांच्या या नव्या हॉटेलचं नाव 'मनी हॉटेल अँड रेस्टॉरंट' असं आहे.
दिपाली यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या नव्या हॉटेलची झलक दाखवली आहे. शिर्डीतील त्यांच्या या हॉटेलला भाजपाचे विनोद तावडे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी भेट दिली. दरम्यान, दिपाली यांनी 'जाऊ तिथे खाऊ', 'चश्मेबहाद्दूर', 'लग्नाची वरात लंडनच्या दारात', ‘मुंबईचा डबेवाला’, ‘करायला गेलो एक’, ‘लग्नाचा धुमधडाका’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.