देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं 'राम भजन'; अजय-अतुलचं संगीत अन् अमृता फडणवीसांचा स्वरसाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:57 IST2024-02-03T11:56:22+5:302024-02-03T11:57:05+5:30
अमृता फडणवीसांनी गायलं देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं 'राम नाम'; अजय-अतुलने दिलंय संगीत

देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं 'राम भजन'; अजय-अतुलचं संगीत अन् अमृता फडणवीसांचा स्वरसाज
काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. याची सर्वत्र देशभर चर्चा सुरू होती. डोळे दिपवून टाकणारा असा हा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'राम भजन' लिहिलं आहे. अमृता फडणवीसांनी याबाबत एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अमृता यांना गाण्याचीही प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या गाण्याला आवाज दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं राम भजन हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. झी म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवरुन हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्याला सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. तर अमृता फडणवीसांबरोबर अजय-अतुल यांनीही हे गाणं गायलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं राम नाम हे राम भजन २ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. काही मिनिटांतच या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.