देवाक काळजी रे... गाण्याची जन्मकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:33 PM2023-01-29T12:33:19+5:302023-01-29T12:33:57+5:30

Devak Khari Re : यू ट्यूबवर जवळपास हंड्रेड मिलियन (१० कोटी) च्यावर व्ह्यूज... यावरून ‘देवाक काळजी’ या गाण्याची लोकप्रियता कळाली असेल. अनेकांना हे गाणे संकट काळात मानसिक आधार देणारं वाटतं.

Devak Khari Re... The birth story of the song | देवाक काळजी रे... गाण्याची जन्मकथा

देवाक काळजी रे... गाण्याची जन्मकथा

googlenewsNext

- गुरू ठाकूर, गीतकार
यू ट्यूबवर जवळपास हंड्रेड मिलियन (१० कोटी) च्यावर व्ह्यूज... यावरून ‘देवाक काळजी’ या गाण्याची लोकप्रियता कळाली असेल. अनेकांना हे गाणे संकट काळात मानसिक आधार देणारं वाटतं. अनेकांचे मेसेज, प्रतिक्रिया, मेल येत असतात. मानसिक तणावात हे शब्द खूप धीर देतात, असं बरेच जण आवर्जून सांगतात. रेडू चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत इतकं लोकप्रिय होईल याची कल्पना नव्हती. 

वैयक्तिक आयुष्यात अतिशय मोठ्या संकटातून जात असताना... आजूबाजूला कोणताही आशेचा किरण दिसत नाही, अशी मनोवस्था असताना चित्रपटाच्या नायकाचं मनोधैर्य वाढवणारे शब्द असलेलं एक गाणं या चित्रपटात हवं होतं. या गाण्याची संपूर्ण सिच्युएशन डोक्यात होती; पण नेमके काय शब्द असावेत, गाण्याचा बाज काय असावा या विचारात अडकल्यामुळे गाणं लिहून द्यायला उशीर होत होता. चित्रपटाचा संगीतकार विजय नारायण गावंडे मला सतत फोन करून गाणे लिहून झाले का, अशी चौकशी करत होता. या चित्रपटाची पार्श्वभूमी कोकणातली असल्याने साहजिकच या चित्रपटाची संवादभाषा मालवणी होती. मी आणि विजय गावंडे दोघेही कोकणातले असल्यामुळे आम्ही अनेकदा एकमेकांशी संवाद साधताना मालवणी भाषेचा वापर करत असतो. त्यामुळे या भाषेतला एखादा विनोद जरी कोणी पाठवला तरी तो मी विजयला फॉरवर्ड करतो. त्या दिवशीही असेच झाले इंग्रजी शब्दांना मालवणीत असलेले पर्यायी शब्द असं म्हणून कोणीतरी विनोद पाठवला होता.

मी गंमत म्हणून तो विजयला फॉरवर्ड केला. त्यावर विजयने मला रिप्लाय केला. मालवणी विनोद नको, मालवणी गाणे हवे आहे. त्यावर मी रिप्लाय केला, काळजी करू नको झिला गाणं मिळेल लवकरच... त्यावर त्याचा रिप्लाय आला, आता देवाकच काळजी. मालवणी भाषेत फार सहज आणि अनेकांच्या तोंडात वरचेवर येणारा शब्द ‘देवाक काळजी’. मला वाटलं की, याच शब्दाभोवती गाण्याची हूकलाईन बांधली तर? मी विजयला तसे म्हणालो देखील. त्याला वाटलं मी थट्टाच करतोय. मी मात्र अतिशय गंभीरपणे ते म्हणत होतो. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांतच मी गाण्याचा मुखडा लिहिला आणि विजयला व्हॉट्सॲप केला.

होणार होतला जाणार जातला, मागे तू फिरू नको उगाच. सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा, इसर गजाल कालची रे... देवाक काळजी रे... माझ्या देवाक काळजी रे... मेसेज पोहोचतात क्षणी विजयचा फोन आला. त्याच्या आवाजात आनंद आणि उत्सुकता ओसंडून वाहत होता. गुरुजी कमाल कमाल लिहिले. पुढे विजयने त्याला अतिशय सुमधूर चाल दिली. अजय गोगावले आणि त्याच्या आवाजात त्याचं सोनं केलं.

 

Web Title: Devak Khari Re... The birth story of the song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.