"धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे... चित्रपटानं पटकावला आणखी एक पुरस्कार, दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:53 PM2022-07-11T12:53:56+5:302022-07-11T13:02:24+5:30
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रसाद यानं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer Mukkam Post Thane) या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे ( Dharamveer Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे.
त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर त्यांची देहबोली, आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून आलं. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला असून, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले.
अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने "धर्मवीर" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओकसह श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत. ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. १३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला. त्यानंतर आता दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आल्याने चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.