...त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले, प्रवीण तरडेचं वक्तव्य आलंं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 07:00 AM2022-09-23T07:00:00+5:302022-09-23T07:00:07+5:30

दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे.

Dharmveer director Pravin Tarde statement came in the discussion | ...त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले, प्रवीण तरडेचं वक्तव्य आलंं चर्चेत

...त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले, प्रवीण तरडेचं वक्तव्य आलंं चर्चेत

googlenewsNext

 धर्मवीर आनंद दीघे यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारीत धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनी घेऊन आली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर सिनेमाचा टीव्ही प्रीमियर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

धर्मवीरचा प्रवासही खूप रंजक आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे. आता प्रवीण तरडे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला या सिनेमाने का बरं घाम फोडला असावा हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तर त्याची कारणंही प्रवीण यांनी सांगितली आहेत. झी टॉकीज वर होणाऱ्या वर्ल्ड प्रीमियर च्या निमित्ताने या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा या सिनेमामेकिंगचा पट गप्पांमधून उलगडला आणि अनेक गोष्टींना उजाळा दिला .
 
 प्रवीण पुढे म्हणाले, अवघ्या पाच महिन्यात या सिनेमाचं काम पूर्ण झालं. सगळं इतकं फास्ट होत होतं की या सिनेमाच्या काही आठवणीच नाहीत. मागचं आठवून आणि साठवून ठेवेपर्यंत पुढचं शेड्यूल तयार असायचं. त्यामुळे सिनेमा बनत असताना कॅमेरामागचा निवांतपणा अनुभवताच आला नाही. पण ती घाई गडबड हवीहवीशी वाटत होती.
 
 प्रवीण सांगतात, सिनेमाचा निर्माता आणि माझा मित्र मंगेश देसाई याची फार इच्छा होती की त्याला आनंद दिघेंची भूमिका करायला मिळावी.  हट्ट नाही पण लुक टेस्ट घेण्याचा मंगेशने आग्रह धरला. पण तो काही आनंद दिघे लुकमध्ये फिट बसला नाही. भाडिपाच्या सारंग साठे याचं नाव पुढे आलं. त्याच्या फोटोवर काम केलं. सारंग दिघे साहेबांच्या जवळपास जात होता, पण त्याच्या काही नियोजित कामासाठी तो परदेशात असल्याने त्याचं नाव मागे पडलं. दरम्यान दिग्दर्शक विजू माने यांनी दिघे करावेत यासाठी त्यांची लुकटेस्ट घ्यायचं ठरलं. पण झालं असं की, विजू माने हे ठाणेकर आहेत. ते म्ह्णाले, मी जर आनंद दिघे पात्र केलं तर माझं ठाण्यातील वावरणं कठीण होईल. माझं स्वातंत्र्य कुठेतरी बंदिस्त होईल. विजू माने यांच्या नकारानंतर मात्र कास्टिंगचं टेन्शन यायला लागलं. तेव्हाच माझ्या एका मित्राने प्रसाद ओकच्या फोटोवर काही ग्राफिक करून आनंद दिघे लुक केला आणि ते फोटो मला पाठवले. प्रसाद दिघेसाहेबांच्या जवळपासच नव्हे तर हुबेहुब दिसत होता. त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले. प्रसादची ऑडिशन घेण्याचा प्रश्नच नव्हता हे त्याने सिनेमातील भूमिकेतून सिध्द करून दाखवले.
 
प्रवीण पुढे म्हणाले, सिनेमा कधी प्रदर्शित करायचा हे मंगेशने ठरवलं होतं त्यामुळे हातात फक्त पाच महिनेच होते. प्रसादचं कास्टिंग झाल्यावर मग एकनाथ शिंदे या पात्रासाठी क्षितिश दाते ही महत्वाची निवड करण्यात यश आलं.  दिग्दर्शक म्हणून प्रत्येक सीनचा काळजीपूर्वक विचार मी केला कारण दिघे साहेबांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या प्रत्येकाला ते आपले वाटले पाहिजेत. अरे, दिघेसाहेब असेच होते ही जेव्हा प्रतिक्रिया मला मिळाली तेव्हा या सिनेमासाठी घेतलेल्या प्रत्येक कष्टाचे सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात होती. 

Web Title: Dharmveer director Pravin Tarde statement came in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.