सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंंत का?, अभिनेत्याने चक्क रेल्वे स्टेशनवर केले होते प्रपोझ; वाचा लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:00 AM2022-03-05T06:00:00+5:302022-03-05T06:00:00+5:30
Siddharth Jadhav:सिद्धार्थ जाधव प्रमाणेच त्याची लव्हस्टोरीदेखील तितकीच हटके आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)ने स्थान निर्माण केले आहे. भूमिकेची लांबी छोटी असली तर आपल्या अभिनयाने ती मोठी करुन आपली छाप सोडण्यात सिद्धार्थ जाधवचा कोणीच हात धरु शकत नाही. अशा या अभिनेत्याला त्याच्या कारकीर्दीत त्याच्या पत्नीचीही मोलाची साथ लाभली आहे. त्याच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांचे लव्हमॅरिज आहे. सिद्धार्थ जाधव प्रमाणेच त्याची लव्हस्टोरीदेखील तितकीच हटके आहे.
सिद्धार्थ जाधवची तृप्तीसोबत पहिल्यांदा ओळख एका ऑडिशनवेळी झाली. तो ऑडिशनसाठी नव्हता आला तर तो घेत होता. त्यावेळी सिद्धार्थ सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता. त्याचवेळी तो देवेंद्र पेम यांच्याकडे 'रामभरोसे' या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. या नाटकाच्या ऑडिशनसाठी तृप्ती अक्कलवार ही पण आली होती. तृप्तीही त्यावेळी नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करत होती. ज्यावेळी ती या ऑडिशनसाठी आली, त्यावेळी ती जर्नलिझम करत होती. तिने ऑडिशन उत्कृष्ट दिली.
सिद्धार्थला तर पहिल्याच भेटीत ती आवडली होती. ऑडिशन चांगली दिल्यामुळे तिला अभिनयासाठी विचारले. पण तिने नकार दिला. सिद्धार्थला तिचा बिनधास्तपणा आवडला होता. त्याने तिला भूमिका करण्याविषयी विनंती केली. परंतु, ती नकारावर ठाम होती. या ४ ते 5 दिवसांच्या काळात सिद्धार्थचे तिच्यावर प्रेम जडले. तृप्ती आता भेटणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले. ते दोघेही एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरत असत. त्यावेळी सिद्धार्थने स्टेशनच्या तिकीट खिडकीजवळ, आजूबाजूला प्रचंड गर्दीत त्याने तृप्तीला थेट लग्नाची मागणी घातली.
तृप्तीला सिद्धार्थला ती आवडते हे माहित होते.पण तो इतक्या लवकर प्रपोज करेल आणि थेट लग्नाची मागणी घालेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे तिने तिथेच त्याला नकार कळवला. पण सिद्धार्थने लगेच तिला मैत्रीसाठी विचारले. मग कालांतरांनी ते वारंवार भेटू लागले. फोन करु लागले. पण त्यावेळीही सिद्धार्थ तृप्तीला म्हणायचा की, जेव्हा तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझ्या नावाचा जरुर विचार कर. पण तृप्तीला त्याच्याबद्दल अजून आकर्षण निर्माण झाले नव्हते.
त्यावेळी दोघेही साधारण २० ते २२ वर्षांचे होते. तृप्तीबाबत सिद्धार्थ खूप पझेसिव्ह झाला होता. तृप्तीबरोबर कोणी बोलले किंवा तिला कोणाचा फोन आला तर त्याला राग यायचा. हे तृप्तीला जाणवले. त्यामुळे तिने त्याच्याशी न बोलण्याचे ठरवले. तिने त्याला तसा निरोपही दिला. पण तिलाही नंतर सिद्धार्थबाबत आकर्षण निर्माण झाले होते. आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवले. मग तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि तब्बल ४ ते ५ वर्षांनी तिने सिद्धार्थला होकार दिला.