'सुभेदार’ करतोय बॉक्स ऑफिसवर राज्य; दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 15:22 IST2023-08-30T15:21:40+5:302023-08-30T15:22:39+5:30
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे.

'सुभेदार’ करतोय बॉक्स ऑफिसवर राज्य; दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पहिल्या पाच दिवसांत या सिनेमाने केलेल्या कमाईचा आकडा समोर आला आहेय
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ने आतापर्यंत जवळपास 6.48 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्यादिवशी 1.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘सुभेदार’ने शनिवारी 1.75 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ०२.२२ कोटी.पहिल्या तीन दिवसांत एकूण ५.०६ कोटींची कमाई कलेल्या सिनेमाने पाच दिवसांत ६ कोटींचा आकडा पार केला आहे.
एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार’ने प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचली आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जातोय.
चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठे' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.