दिग्पाल लांजेकरांनी राखला महाराजांप्रतीचा आदर; शिवरायांच्या मावळ्यासाठी दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:14 PM2023-07-05T19:14:22+5:302023-07-05T19:15:01+5:30
Digpal lanjekar: सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी सुरु असलेल्या सुभेदारांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ‘स्वराज्य निधी’ देत दिग्पाल यांनी मदतीचा हात दिला आहे.
ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार आणि प्रसार दिग्पाल यांनी सातत्याने केला आहे. यातून या अमूल्य ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे.
याच प्रयत्नाचा भाग म्हणून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात सुरु असलेल्या सुभेदारांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ‘स्वराज्य निधी’ देत दिग्पाल यांनी मदतीचा हात दिला आहे. दिग्पाल यांनी याआधी किल्ले प्रतापगडाच्या डागडुगीसाठी तसेच वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीसाठीही पुढाकार घेत खारीचा वाट उचलला आहे.
"छत्रपतींच्या विचारांचा जागर आजच्या आणि पुढच्या पिढीसाठी कायम राहावा यासाठी प्रयत्नशील राहणे ही मी माझी सामाजिक बांधिलकी समजतो. आपल्यापैकी प्रत्येकाने हा विचार आपल्या मनात आणि ध्येयात रुजवायला हवा. नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे हे स्मृतिस्थळ सर्वांसाठी वंदनीय ठरेल आणि पुढील पिढयांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला.
श्रमिकजी चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या ‘सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ संस्थेच्या पुढाकारातून हे काम सुरु करण्यात आले आहे. ‘सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संस्था गडकिल्ले संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंची उभारणी व जतन या कार्यासाठी सुप्रसिद्ध आहे. गडकिल्ले संवर्धनासाठी या संस्थेचे योगदान अमूल्य असे आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सुभेदार तान्हाजी काळोजीराव मालुसरे सभागृहाबाहेर असलेल्या जागेवर या समाधीचे आणि स्मृतीस्थळाचे बांधकाम करण्यात येत आहे.