Dil Dimag Aur Batti Movie Review: 'दिल'से 'दिमाग' तक 'बत्ती' गुल!, जाणून घ्या चित्रपटाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 10:56 AM2022-05-06T10:56:00+5:302022-05-06T11:06:20+5:30
Dil Dimag Aur Batti Movie Review: दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते (Hrishikesh Gupte) यांनी दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घ्या कसा आहे हा मल्टीस्टाटर चित्रपट
कलाकार : सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे
निर्माते : सा क्रिएशन्स. प्रेझेंटर : डॉ. निवेदिता एकबोटे
लेखक, दिग्दर्शक, गीतकार : हृषीकेश गुप्ते
कालावधी : २ तास १० मिनिटे
स्टार - दोन स्टार
चित्रपट परीक्षण :संजय घावरे
तिळतिळाट म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर चित्रपट पाहिल्याशिवाय मिळणार नाही. बरं हा सिनेमा पहायलाच हवा आग्रहही करता येणार नाही. कारण सिनेमा फूल टू फिल्मी स्टाईलमध्ये आहे. दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते (Hrishikesh Gupte) यांनी या चित्रपटाच्या रूपात जरी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो तितकासा प्रभावी न वाटता कल्पना विस्ताराची अतिशयोक्ती असा काहीसा वाटतो. मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा उत्तम अभिनय ही या चित्रपटाची एकमेव जमेची बाजू आहे. 'दिमाग'ची 'बत्ती' विझवून केवळ 'दिला'च्या साथीनं घेतलेला हा 'जावईशोध' आहे.
चित्रपटाचे नायक मनमोहन देसाईंच्या माध्यमातून कथानक सुरू होतं. मनमोहन हे नाव बदण्यासाठी ते न्यायालयाची पायरी चढतात आणि गोष्ट सुरू होते. जावई अमिताभ हरवल्याची तक्रार घेऊन देसाई पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिथून कथा उलगडत जाते. देसाईंची मुलगी जया ही अमिताभला जेव्हा गरोदर असल्याची गोड बातमी देते, तेव्हा आनंदाच्या भरात नाचताना केळ्याच्या सालीवरून घसरून अमिताभ पडतो. त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो हरवतो. दोन मुलं आणि एक मुलगी असं जयाला तिळं असतं. तिघांची ताटातूट झालेली असते. जावयाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत ताटातूट झालेली भावंडं सापडतात. या दरम्यान जयाच्या मुलांप्रमाणेच त्यांच्या घराण्यातील आणखी दोन तिळ्यांचा उलगडा होतो.
डोकं बाजूला ठेवून एक फिल्मी स्टाईलची स्टोरी पाहण्यासाठी गेलात तर हा चित्रपट पाहताना जास्त त्रास होणार नाही. यात कोणत्याही लॅाजिकचा शोध घेण्याचा प्रयत्न केलात तर त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ गंमत म्हणून जरी हा पहायचा म्हटला तरी इतकीही अतिशयोक्ती नको होती असं वाटतं. पटकथेची मांडणी चांगली केली असून, त्यात गुंफण्यात आलेल्या घटना आणि त्या अनुषंगानं समोर येणारी कॅरेक्टर्स उत्सुकता वाढवतात. एकाच कथानकात बरेच ट्रॅक्स आहेत. यापैकी ज्योतिष आणि मामाचा ट्रॅक चांगला असून, क्लायमॅक्समध्ये उलगडणारा आहे. अमिताभचं हरवणं, पोलिस अधिकाऱ्याची बावळटगिरी, बैलगाडीवरून दुर्बिणीच्या माध्यमातून चोरांचा पाठलाग करणं, लतिफचं ५०० लोकांची मागणी करणं, शेख बंधूंची भांडणं, एकाच स्पॅाटवर सर्वांचं जमा होणं हे सर्व खूपच बालिश वाटतं. एका चांगल्या दिग्दर्शकाकडून अशा प्रकारच्या चित्रपटाची कधीच अपेक्षा नसते. गाण्यांमध्येही दम नाही. कॅमेरावर्क व इतर तांत्रिक बाबी सामान्य दर्जाच्या आहेत.
अमिताभ, जया, रेखा, धर्मेंद्र, दिलीप कुमार, मनमोहन देसाई या फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांच्या नावाच्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा हृषिकेश यांचा प्रयत्न होता. पण लेखन-दिग्दर्शनात ढिसाळ कामगिरी झाल्यानं तो तितकासा प्रभावी वाटत नाही. कलाकारांचा अभिनय ही सर्वात मोठी बाजू आहे. दिलीप प्रभावळकरांसह सोनाली कुलकर्णीनं साकारलेली तिनही कॅरेक्टर्स खूप वेगळी वाटतात. म्हातारपणातील भूमिकेसोबतच तरुणपणातील व्यक्तिरेखेशीही प्रभावळकर अगदी सहजपणे एकरूप झाले आहेत. सोनालीच्या तिन्ही व्यक्तिरेखा दमदार असून, क्लायमॅक्समध्ये कोळीणीच्या भूमिकेत तिची अॅक्शन पहायला मिळते. वैभव मांगलेनं वयस्कर आणि तरुण असे दुहेरी ज्योतिषी छान रंगवले आहेत. वंदना गुप्तेंनी यापूर्वी कधीही न साकारलेली दरोडेखोर यात आहे. पुष्कर श्रोत्रीनं अमिताभ आणि धर्मेंद्र छान केले आहेत. पुष्कराज चिरपुटकरच्या रूपातील पंजाबी पप्पी गंमतीशीर आहे. आनंद इंगळेचा दिग्दर्शकही चांगला झालाय. संस्कृती बालगुडे आणि सखी गोखले यांनीही चांगलं काम केलं आहे. थोडक्यात काय मनोरंजनाचा अगदीच काही पर्याय नसेल आणि या चित्रपटाबाबत खूपच कुतूहल वाटत असेल, तर पहायला हरकत नाही, पण फार अपेक्षा ठेवून जाता कामा नये.