तू गेल्यावर काय लिहिणार होतो? पण आज...! निशिकांत कामत यांच्या आठवणीने भावुक झालेत संजय जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:48 PM2021-04-29T16:48:53+5:302021-04-29T17:17:33+5:30
गतवर्षी निशिकांत कामत यांचे निधन झाले. आज याच मित्राच्या आठवणीने संजय जाधव यांना भरून आले...
जुने फोटो पाहिले आणि अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav )यांचे मन आठवणींनी भरून आले. निशिकांत कामत या मित्राच्या एक ना अनेक आठवणी, त्याच्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा जिवंत झालेत. गतवर्षी निशिकांत कामत ( Nishikant Kamat) यांचे निधन झाले. आज याच मित्राच्या आठवणीने संजय जाधव यांना भरून आले. मित्राच्या आठवणीत त्यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
संजय जाधव यांनी लिहिले...
तू गेल्यानंतर मी सोशल मीडियावर काहीच लिहिले नव्हते. लिहायचे मन नव्हते. तसेही काय लिहिणार होतो? ‘रेस्ट इन पीस निशी? नाही रे...आज वासूने मला हे फोटो पाठवलेत आणि हे फोटो शेअर करण्याची का कुणास ठाऊक इच्छा झाली. पार्टी करायला आपल्याला काहीच कारण लागायचे नाही. सिनेमा सुरू झाला, चांगला शॉट झाला किंवा अगदी वाईट काम केले, सिनेमा संपला, पहिली कॉपी आली, पुरस्कार मिळाला... निमित्त काहीही असो अशा आपण खूप पार्ट्या केल्यात. पार्टी करताना तुझ्या आणि माझ्या चर्चेचा एकच विषय असायचा. तो म्हणजे, तू बेस्ट दिग्दर्शक की मी? आपल्यात नेहमीच मतभेद होते. पण त्या मतभेदांना विचारांची एक बैठक होती. मित्रा, ते क्षणच खूप खास होते. सोनेरी होते... मला खात्री आहे, तू आणि अमित पवार पुढच्या प्रोजेक्टवरच बोलत असाल आणि नक्कीच तुमच्या हातात ग्लास असतील... चीअर्स निशी...’, असे संजय जाधव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
निशिकांत कामत यांचे गतवर्षी निधन झाले होते. डोंबिवली फास्ट, लई भारी, दृश्यम असे अनेक सुपरहिट सिनेमे देणारे आणि महाराष्ट्राचा झेंडा बॉलिवूडमध्ये डौलाने फडकवणा-या निशिकांत यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता. हैदराबादेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती.