हात जोडून विनंती करतो की...; मराठी प्रेक्षकांना दिग्दर्शकाची भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 10:20 AM2021-11-19T10:20:00+5:302021-11-19T10:21:36+5:30
हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून... सगळ्यांच्यावतीने... सगळ्यांसाठी...; Sameer Vidwans यांची पोस्ट...!
चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस (Sameer Vidwans). मराठीत धुरळा, डबल सीट, टाइम प्लीज, आनंदी गोपाल सारखे दर्जेदार सिनेमे देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्र्शक समीर विद्वांस आता बॉलिवूड गाजवण्यासाठीही सज्ज झाले आहेत. ‘सत्यनारायण की कथा’(नाव बदललं जाणार आहे) हा त्यांचा पहिलावहिला बॉलिवूड सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास समीर यांची एक पोस्ट चर्चेत आहेत.
‘हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून... सगळ्यांच्यावतीने... सगळ्यांसाठी....,’ असं लिहित त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये समीर यांनी मराठी मायबाप प्रेक्षकांना हात जोडून विनंती केली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारलाही विनंती केली आहे.
हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून..
— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) November 18, 2021
सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी..
🙏🏽🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/G2XuW8vpWZ
काय आहे समीर यांची पोस्ट...
ते लिहितात, ‘गेलं दीड वर्ष सगळ्यांसाठीच आर्थिक गणित कोलमडून टाकणारं गेलंय, अजूनही जातंय. मनोरंजन क्षेत्रही ह्यातून सुटलं नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडतायत. करोडोची गुंतवणूक 2 वर्ष अडकून आहे. त्यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे आणि आत्ता कुठे गाडी यार्डातून बाहेर येत्ये. पण ती नीट रूळावर आणणं पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या हातात आहे. एकीकडे हिंदीचे 1550 करोड पार आकडे बघताना मनापासून वाटतं की असाच भरघोस हाऊसफूल प्रतिसाद मराठी चित्रपटांनाही मिळावा! ते चित्र बघायला आणि अनुभव घ्यायला आम्ही सर्व कलाकार आणि मंडळी आसूसलोय! खरंच! पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा येणारे मराठी चित्रपटही प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन पाहतील. तसं घडलं तर ते ‘तूफान हाऊसफूल’ दिवस दूर नाहीत.
खरंच सांगतो आम्हा सगळ्या कलाकारांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी चित्रपट शक्य तितके चित्रपटगृहात जाऊनच बघा. नाही आवडले तर तसं मोकळेपणाने सांगाच, तो तुमचा हक्कचं आहे पण तुम्ही जर भरभरून प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपली मराठी चित्रपटसृष्टी परत एकदा हळूहळू रांगायला...चालायला आणि मग धावायला लागेल. ह्याच बरोबर राज्यसरकारलाही विनंती आहे. बाकी सगळं अगदी नीट व्यवस्थित सुरू झालंय तर मग चित्रपट आणि नाट्यगृहही पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत...’