Diwali 2022: ‘तेव्हापासून मी वाजणारे फटाके बंद केले...’; वाचा, मराठी कलाकारांच्या आठवणीतील दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 05:55 PM2022-10-23T17:55:58+5:302022-10-23T18:44:48+5:30
Diwali Memories Of Marathi Celebrities: प्रत्येकाच्या मनाच दिवाळीची एक खास आठवण असते. काही कलाकारांनीही त्याच्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. वाचा...
-संजय घावरे
Diwali Memories Of Marathi Celebrities: नेहमी शूटिंगमध्ये बिझी असणाऱ्या कलाकारांनाही दिवाळीत घरची ओढ लागते, पण कामाच्या कमिटमेंटसमुळं कित्येकदा त्यांना घरी पोहोचणं शक्य होत नाही. अशाच काही मराठी कलाकारांनी सांगितलेल्या आपल्या आठवणीतल्या दिवाळीच्या किस्स्यांवर एक नजर...
- स्वप्नील जोशी
बालपणी गिरगावातील झावबाच्या वाडीतील लक्ष्मीबाईंच्या चाळीत राहताना बऱ्याच घरून फराळ यायचा. त्यातील प्रत्येकातील काही ना काही आवडायचं. पहाटे सव्वा पाचला पाणी यायचं. दिवाळीत आई उटणं लावून आंघोळ घालायची. नवीन कपडे घालून सुर्योदयापूर्वी गोराराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन धावत परत यायचो. कारण दर्शन घेतल्याखेरीज फटाके आणि फराळ मिळत नसायचा. घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-बाबा फटाके विकायचे. त्यांना फटाके पॅक करायला मदत करायचो. बाबा सायकलवरून गिरगावपासून बांर्द्यापर्यंत फटाक्यांची ऑर्डर पोहोचवायचे. त्यामुळे फटाके विकून चार पैसे आल्यावर खरी दिवाळी साजरी व्हायची. दिवाळीनं पैसे वाचवायला आणि कमवायलाही शिकवलं. आई-वडीलांनी चांगलं भविष्य देण्यासाठी केलेली मेहनत ही माझ्यासाठी सर्वात मोठी आठवण आहे.
- सोनाली कुलकर्णी
एकदा दिवाळीत मी हैदराबादमध्ये शूट करत होते. एका मुस्लीम डॉक्टरांच्या घरी आमचं शूट सुरू होतं. त्या वर्षी दिवाळी आणि ईद एकत्र आली होती. त्यावेळी शूटिंग करताना आम्ही दिवसा दिवाळीचा फराळ खायचो आणि संध्याकाळी डॉक्टरांच्या घरून आलेल्या शिर-कुर्मावर ताव मारायचो. त्यावेळी आपण नक्की काय सेलिब्रेट करतोय हे समजत नव्हतं. सर्वजण दोन्ही सणांचा आनंद लुटत होतो. ती दिवाळी आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करणारी वाटली. मी घरच्यांपासून दूर होते, पण डॉक्टर फॅमिलीनं ते जाणवू दिलं नाही.
- सयाजी शिंदे
फटाके वाजवल्यानं पक्ष्यांचं खूप नुकसान होतं. अशी दिवाळी मला अपेक्षित नाही. प्राणी-पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार असल्याचं भान राखायला हवं. पैशांचा धूर काढून अघोरी दिवाळी साजरी न करता पणत्या लावून तेजोमय दिवाळी करावी. बालपणी थंडीत गरम पाण्यानं आंघोळ करण्यापूर्वी आई उटणं लावायची. आजूबाजूच्या घरी जाऊन फराळ खायचो. तेव्हा फटाके नव्हते. आम्ही डोंगरावर जाऊन आसूड वाजवायचो. त्याचा आवाजात कड्या-कपाऱ्यांमध्ये घुमायचा.
- किशोरी शहाणे
आपली संस्कृती जपायला मला खूप आवडते. वसुबारसला गाय-वासराची रांगोळी काढणं आणि दिवाळीत सकाळ-संध्याकाळ ठिपक्यांची रांगोळी काढायला आवडतं. यासाठी बिझी शेड्यूलमधून वेळ काढते. दोन वर्षांपूर्वी नेमकं दिवाळीतच अमेरिकेत शूटिंग होतं. त्यावेळी घरची दिवाळी मिस करत होते. अमेरिकेतच प्रिया कृपलानी ही मैत्रीण रहाते. तिच्या घरी दिवाळीला गेले. स्केचपेन्सने रांगोळी काढली. त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. तिथे त्यांच्या घरीही लक्ष्मीपूजन केलं आणि व्हिडीओ कॉलवरून घरच्या देव्हाऱ्यातील पूजा-आरती केली. यंदा लक्ष्मीपूजनच्या दिवशी शूटिंग करणार आहे.
गावाकडची दिवाळी खूप वेगळी होती. माझ्या आजोबांच्या बिडकीन या गावी सर्व परिवार एकत्र जमायचा. आम्हा नातवंडांची धमाल-मस्ती असायची. नऊ वर्षांचा असताना एकदा माझ्या हातात बॉम्ब फुटला होता. तेव्हापासून मी वाजणारे फटाके बंद केले. आज मुलांच्या आनंदात व्यत्यय आणत नाही, पण आवाज न करणारे फटाके आणतो. फटाक्यांमुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुलांसोबतच पक्ष्यांनाही त्रास होतो ही भूमिका मुलांनाही पटवून दिली आहे. त्यामुळे आमच्याकडेही प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी होते.
- देविका दफ्तरदार
माझ्या दिवाळीच्या आठवणी घराशी रिलेटेड आहेत. लहानपणाची प्रत्येक दिवाळी घरी साजरी व्हायची. आमचं कुटुंब एकत्र होतं. सर्वांचे फ्लॅटस वर-खाली होते. आजी, मावशा, मामा असे सर्व पुण्यात एकाच ठिकाणी रहायचो. त्यामुळे घरी खूप माणसं असायची. दिवाळीला एकत्र फराळ करायचो. सकाळी छान दही-पोह्यांचा बेत असायचा. एकूणच दिवाळी म्हणजे चवदार खाण्याचा सोहळाच असायचा. आज कामाच्या धावपळीत ते क्षण हरवलेत. आजची दिवाळी शूटिंगमध्ये हरवून गेली आहे.
- अभिनय बेर्डे
माझा वाढदिवस ३ नोव्हेंबरला असल्याने दरवर्षी दिवाळीत किंवा आसपास येतो. त्यामुळे दिवाळी स्पेशल आहे. एक दिवाळी लंडनमध्ये साजरी केली होती. त्या दिवाळीला घरापासून दूर गजेंद्र अहिरेंच्या चित्रपटाचं शूट करत होतो. तिथे आम्हाला एक वेगळी दिवाळी अनुभवता आली, जी विसरता येणार नाही. वडील असताना मोठ्या हौसेने दिवाळी साजरी करायचो. बालपणी फटाके वाजवायचो, पण निसगार्साठी धोकादायक असल्याचं जाणवल्यावर बंद केलं. आम्ही १० भाऊ आणि एकच बहिण असल्याने भाऊबीजही स्पेशल आहे.
- विराजस कुलकर्णी
नवीन लग्न झाल्यानं यंदा सारं नवीन आहे. यासोबतच नवीन जबाबदारीचं भान राखावं लागेल. आमच्या प्रोफेशनमध्ये सणासुदीलाही काम करावं लागतं. बऱ्याच वर्षांनी मी, शिवानी आणि आई-बाबा असे आम्ही सर्वच फ्री आहोत. त्यामुळे हि दिवाळी घरच्यांसोबत साजरी होणार आहे. इयत्ता दुसरीत असतानाच मला फटाके नाही वाजवायचे असं मी घरी सांगितलं होतं. फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, पृथ्वीचं आणि निसर्गचं नुकसान होतं असं शाळेत ऐकल्यानं बालपणीच त्याची जाणीव झाली होती. त्यामुळे मी फटाके न वाजवता फराळ खाऊन दिवाळी सेलिब्रेट करतो.
- शिवानी रांगोळे
लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्यानं खूप एक्साइटमेंट आहे, पण विराजससोबत मीसुद्धा कामात बिझी असल्यानं दिवाळीपूर्वी फार वेळ देऊ शकलो नाही. आता दिवाळीत एकमेकांना वेळ देणार आहोत. सर्वांची खरेदी झाली आहे, एकमेकांसाठी गिफ्टस घेतली आहेत, पण सरप्राईज आहे. लहानपणी मी जिथे रहायचे त्या हॉलच्या खिडकीतून एक झाड दिसायचं. त्यावर एक घरटं होतं. अचानक एक बाण आला आणि त्या घरट्याला आग लागली. सुदैवानं घरट्यात कोणी नव्हतं, पण ते मनाला खूप भिडलं. फटाक्यांमुळे पक्ष्यांना, प्राण्यांना त्रास होत असल्यानं बालपणापासून फटाके वाजवणं बंद केलं.