Diwali 2018: प्रिया बापट आणि उमेशसाठी दिवाळी म्हणजे गप्पांची मैफल, जुन्या मित्र-मैत्रिणींसह साजरा करणारा तेजपर्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:04 PM2018-11-05T13:04:30+5:302018-11-05T13:05:44+5:30
गेल्या वर्षी आपल्या घरी दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे तिने सांगितले. यंदा मात्र आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याचे तिने सांगितले.
तेजपर्व दिवाळी सणाला सुरूवात झालीय. प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकजण साजरा करत आहे. यांत कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती अभिनेता उमेश कामतही दिवाळीचा सण दरवर्षी उत्साहात साजरा करतात. दिवाळीच्या दिवसांत प्रिया कामापासून सुट्टी घेऊन कुटुंबीयांसह हा सण साजरा करते. मात्र यावेळी ते शक्य नसलं तरी कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्यासाठी खास वेळ राखून ठेवल्याचे प्रिया सांगते. गेल्या वर्षी आपल्या घरी दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे तिने सांगितले. यंदा मात्र आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याचे तिने सांगितले. या निमित्ताने जवळपास २० वर्षांनंतर सगळे जुने मित्र मैत्रिणी एकत्र येणार असल्याचे तिने सांगितले आहे.
यावेळी पुन्हा एकदा गप्पांची मैफल रंगणार असून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल शिवाय मनसोक्त खाण्याचा आनंद घेणार असल्याचे तिने सांगितले आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याला प्रिया बालपणापासून महत्त्व देेते. सातव्या इयत्तेत असल्यापासून फटाके फोडत नसल्याचे तिने सांगितले आहे. उमेशलासुद्धा फटाके फोडायला आवडत नाही हेही तिने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपलं योगदान देण्याची गरज असल्याचे तिने सांगितले आहे. दिवाळी हा सण प्रदूषण वाढवण्यचा नव्हे तर आनंद पसरवण्याचा सण असल्याचेही तिने म्हटले आहे. यावेळी वेळेअभावी दिवाळी फराळ करू शकले नसले तरी बेसनाचे लाडू बनवल्याचे तिने सांगितले. मात्र त्याला आईने बनवलेल्या लाडवाची किंवा तिच्या फराळाची चव नक्कीच नसेल हे सांगायलाही ती विसरली नाही.