‘रंगू’च्या अशा झाल्या 'सुलोचना' दीदी, तुम्हाला माहिती यामागची गोष्ट ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 08:33 PM2023-06-04T20:33:17+5:302023-06-04T20:39:26+5:30
सुलोचना दीदींच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे प्रदीर्घ आजाराने आज वयाच्या ९४व्या वर्षी निधन झालं आहे. मराठी सिनेमांमध्ये नायिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि बॉलिवूडच्या पडद्यावर आई म्हणून मान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुलोचनादीदींची यांचं सिनेमात येण्याआधी रंगू हे नाव होतं. त्यांच्या सुलोचना कशी झाली जाणून घेऊया यामागची रंजक गोष्ट.
वास्तवातील वर उल्लेखित व्यक्तिरेखा अभिनयाने संपन्न करणा-या सुलोचना दीदींचा जीवनपट दीर्घ आहे. ‘रंगू’ कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात जन्म घेते आणि अख्ख्या भारतीय रसिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करते, हे समाज संस्कृतीचं उत्तम उदाहरण आहे.
भालजी पेंढारकरांसारख्या व्यक्तीने या ग्रामीण ‘रंगू’ला निरखलं आणि ‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे यांच्यासमोर, बरोबर एका छोट्या भूमिकेत उभं केलं. रंगूच्या बोलक्या डोळ्यांचं ‘सुलोचना’ असं नामकरण भालजींनीच केलं. सासुरवास, जयभवानी, मीठभाकर अशी चढती मार्गाक्रमणा सुरू झाली. भालजी पेंढारकरांच्या त्या शिष्या झाल्या. त्यांना मराठी भाषा, संस्कार यांचे शिक्षण मिळालं, सोबत मिळत गेली. त्यात ग. दि. माडगूळकर, दत्ता डावजेकर, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, दिनकर द. पाटील, मीनाक्षी, सुमती गुप्ते अशी मोठी माणसं भेटली. त्यांचा ‘मीठभाकर’ जळितामध्ये जळून गेला. या दरम्यान ‘मंगल पिक्चर्स’च्या ‘जिवाचा सखा’साठी त्यांची निवड झाली.
या चित्रपटाचं थोडं वेगळेपण आणि महत्त्व नमूद करायला हवं. सुधीर फडके, माडगूळकर आणि राजा परांजपे ही त्रयी एकत्र आली. तिघांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. पुढे सुमारे पन्नास वर्षांत या त्रयीने मराठी चित्रपटांमध्ये स्वत:ची ठसठशीत मुद्रा असलेलं एक युग निर्माण केलं, तसाच नायिका म्हणून दीदींचा बोलबाला झाला. एकापाठोपाठ चित्रपट आले आणि सुलोचना, मा. विठ्ठल, चंद्रकांत यांच्यासह मराठीतील अव्वल अशा जोड्या प्रेक्षकांना आवडत गेल्या. ‘मीठभाकर’ नव्याने केला. सुलोचना दीदींच्या सात्त्विक अभिनयाने त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
‘एकटी’ मधली आई आणि ‘मोलकरीण’मधील आई. दोन्ही ठिकाणी आईचीच भूमिका; पण या दोघींच्या वाट्याला त्यांच्या मुलांकडून आलेले अनुभव भिन्न ! या दोन्ही भूमिका रंगवताना दु:ख, करुणा, प्रेम, मातृवात्सल्य यांच्या छटा अभिनित होताना डोळे भरून येतात. सहनशीलता, सोशिकपणा आणि संस्कारित सोज्ज्वळता यांची त्या मूर्तिमंत साक्ष होतात. सुलोचना दीदींच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.