डोक्यावर फेटा, गळ्यात माळ अनोख्या गेटअपमध्येमधील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:00 AM2022-09-16T07:00:00+5:302022-09-16T10:17:38+5:30

काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात.

Do you know this Maratha actor in a unique getup | डोक्यावर फेटा, गळ्यात माळ अनोख्या गेटअपमध्येमधील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

डोक्यावर फेटा, गळ्यात माळ अनोख्या गेटअपमध्येमधील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी वजन घटवतं... कोणी टक्कल करतं, तर कोणी केस वाढवतं... तर काही कलाकार तास न तास आरशासमोर बसून मेकअपच्या माध्यमातून आपला लूकच बदलतात. कोणतीही व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारण्यात माहिर असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत शशांक शेंडे. शशांक यांनी आजवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मनाचा थरकाप उडवणाऱ्या भाईपासून पिचलेल्या शेतकऱ्यापर्यंत आणि शहरातील सर्वसामान्य गृहस्थापासून खेड्यातील गावकऱ्यापर्यंत सर्वच भूमिकांमध्ये शशांक यांनी जीव ओतला आहे. आता पुन्हा एकदा ते नव्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'पल्याड' या आगामी मराठी चित्रपटात रसिकांना शशांक यांचा बदललेला लुक पहायला मिळणार आहे.

 या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश भीमराव दुपारे यांनी केलय. 'पल्याड' हा चित्रपट स्मशानजोगी समाजातल्या एका परिवाराची गोष्ट सांगणार आहे. 'पल्याड'मधील शशांक यांचा लुक काहीसा फकीरासारखा आहे. वाढलेली दाढी-मिशी, भगवं वस्त्र, डोक्यावर फेटा, खांद्यावर उपरणं, कपाळासोबतच दोन्ही डोळ्यांच्या खालच्या बाजूस लावलेला अष्टगंध, गळ्यात विविध प्रकारच्या माळा, शंख, तावीज, हातामध्ये घुंगरू लावलेली काठी आणि घंटी असा आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळा शशांक यांचा गेटअप 'पल्याड'मध्ये आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या कॅरेक्टरचं नाव आणि शशांक यांनी अशा प्रकारचा वेष का धारण केला आहे त्याचं गुपित सध्या तरी उघड करण्यात आलेलं नाही. 'पल्याड'मधील आपल्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पहायला शशांकही आतुरले आहेत. याबाबत शशांक म्हणाले की, या चित्रपटाचं टायटलच बरंच काही सांगणारं आहे. 'पल्याड' म्हणजे पलीकडे, पण कशाच्या पलीकडे याचे बरेच अर्थ काढता येऊ शकतात. हा चित्रपट नेमका कोणत्या गोष्टीवर भाष्य करणारा आहे हे लवकरच प्रेक्षकांना समजेल. या चित्रपटात मी साकारलेलं कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचं आहे. हे कॅरेक्टर नेमकं काय आहे आणि ते कोणतं काम करणार आहे याची उकलही चित्रपट पाहिल्यावरच होईल. हे कॅरेक्टर साकारण्यासाठी एका वेगळ्या लेव्हलच्या उर्जेची गरज होती. गेटअपच्या जोडीला बोलीभाषा, देहबोली आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर हे कॅरेक्टर साकारल्याचंही शशांक म्हणाले.

'पल्याड'ची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी केलं आहे. शशांकसोबत या चित्रपटात देविका दफ्तरदार, रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, गजेश कांबळे, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उईके, रवी धकाते, सुमेधा श्रीरामे, चैताली बोरकुटे, अश्विनी खोब्रागडे आणि सचिन गिरी हे कलाकार आहेत. चेतन कोंडविलकर यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले असून रंगभूषा स्वप्नील धर्माधिकारी यांनी केली आहे. एका वेगळ्या वाटेनं जाणारा 'पल्याड' के सेरा सेरा या डीस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या ४ नोव्हेंबरला  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Do you know this Maratha actor in a unique getup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.