'धुम धडाका' सिनेमातील अंबाक्का आठवतेय का?, आता दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:00 AM2021-10-12T07:00:00+5:302021-10-12T07:00:00+5:30
१९८५ साली धुम धडाका हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
१९८५ साली धुम धडाका हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले आहे. या चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, ऐश्वर्या राणे, प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटात अंबाक्काची भूमिका अभिनेत्री प्रेमा किरण यांनी साकारली होती.
प्रेमा किरण या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. त्यांचे बरेच चित्रपट गाजले आहेत. त्यात धुमधडाका, पागलपम, अर्जुन देवा, उतावळा नवरा, लग्नाची वरात लंडनच्या घरात या चित्रपटांचा समावेश आहे.
त्यांनी १९८९ साली उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २०१७ साली प्रेमा किरण पिंताबर काळे यांच्या गाव थोर पुढारी चोर या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर प्रमुख भूमिकेत होते.त्यानंतर त्या फ्रेंडशीप बॅण्ड आणि एए बीबी केके या चित्रपटात दिसल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी प्रेमा किरण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पक्षाचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याचे सांगितले. नव्या कलाकारांना दूरचित्रवाणी मालिकांचे पैसे तीन महिने मिळत नाही तसेच चित्रपटांचेही पैसे वेळेवर मिळत नाही. तसेच पडद्यामागच्या कलाकारांना तर कोणीही वाली नसतो. त्याच्यासाठी आता काम करण्याची इच्छा आहे. महामंडळ असले तरी, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे, असे प्रेमाकिरण यांनी त्यावेळी सांगितले होते.