कुणी सिनेमा देता का सिनेमा! मानसी नाईकने रुपेरी पडद्यावर काम मिळत नसल्याची व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 18:58 IST2023-08-19T18:57:45+5:302023-08-19T18:58:07+5:30
Manasi Naik : मानसी नाईक हिने एका मुलाखतीत काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

कुणी सिनेमा देता का सिनेमा! मानसी नाईकने रुपेरी पडद्यावर काम मिळत नसल्याची व्यक्त केली खंत
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मानसी नाईक सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. तर कधी तिच्या विधानांमुळेही ती चर्चेत येत असते. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
नुकतीच मानसी नाईक हिने गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये मानसीने विविध विषयांवर चर्चा केली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. मानसी बऱ्याचदा सोशल मीडियावर रिल्स करताना दिसते. चित्रपटांपेक्षा ती जास्त रिल्स करताना दिसते. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, मला एक दिग्गज दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजून रिल्स करतेस का? लोकांनाही प्रश्न पडतो की, एवढी मोठी कलाकार असूनही ही रिल्स करते. मी त्या दिग्दर्शकाला म्हटलं होतं की, मी मोठी कलाकार नाही. मला मोठं व्हायचंय. दुसरी बाब म्हणजे मला चित्रपटात काम मिळत नाही म्हणून मी रिल्स करते, अशी खंतदेखील यावेळी मानसीने बोलून दाखवली.
माझी कष्ट करायची तयारी असते...
मानसी पुढे म्हणाली की, चित्रपट मिळत नसेल तर त्याची खंत प्रत्येक कलाकाराला असते आणि मलाही आहे. मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. माझी कष्ट करायची तयारी असते. भार्गवीनं मुलाखतीत मानसीला तिच्या पहिल्या चित्रपटातील किसिंग सीनबद्दल विचारलं होतं. तेव्हा मानसी म्हणाली, 'मी त्या चित्रपटात एक नाही तर दोन किसिंग सिन दिले होते.'