'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 05:36 PM2023-07-04T17:36:18+5:302023-07-04T17:36:38+5:30
Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्यांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच रविवारी नाट्यमय घडामोडी घडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या राजकीय नाट्यमय घडामोडीवर मनोरंजसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपली मते मांडली. दरम्यान आता अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्यांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओत सयाजी शिंदे काही गावकऱ्यांसोबत दिसत आहेत. त्यांच्या मागे एक मोठं वटवृक्ष पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत सयाजी शिंदे म्हणताना दिसत आहेत की, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभ सकाळ. उठलात? आता सगळ्यांनी झोपा आणि कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका. जर कुठल्या पक्ष्याला फॉलो करायचेच असेल, तर घुबडाला करा. सयाजी शिंदेंच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये सहमतीही दर्शवली आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, आपला एकच पक्ष...झाडांवर लक्ष. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, एखाद्या पक्षा पेक्षा एक वटवृक्ष बर. आणखी एका युजरने म्हटले की, आमचा एकच पक्ष शेतीवर लक्ष.
तसेच सयाजी शिंदे यांनी आणखी काही व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातील एक व्हिडीओ ‘मी पुन्हा येईन’ या वेब सीरिजमधला सीन आहे. या व्हिडीओत काही पत्रकार हे सयाजी शिंदेंना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एक महिला पत्रकार विचारते की, मुख्यमंत्रीपदाचा काय खेळ चालू आहे, हे जनतेला नको कळायला? त्यावर सयाजी शिंदे बोलताना दिसत आहेत की, कशाला कळायला पाहिजे? रात्री काय झालं?, मध्यरात्री काय झालं?, पहाटे काय झालं?, सकाळी काय झालं? यात जनतेचा काय संबंध? तर दुसरा पत्रकार विचारतो, सर, तुमचं बरोबर आहे; पण लोकशाही आहे. यावर सयाजी शिंदे म्हणतात, आमदार, खासदार यांना निवडून देण्याइतपत जनतेचा संबंध येतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडून देणं हे पक्षाचं काम आहे. जनतेला कोणी विचारतं का, की बाबा कुठला मुख्यमंत्री हवाय? भाषणात ठीक आहे; लोकांचं राज्य आहे. जनतेच्या हातात नाड्या आहेत. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. खरी परिस्थिती मांडली टायमिंग लयच करेक्ट हाय, असे एका युजरने म्हटले आहे. या सीरिजमधलं हे संभाषण नेटकऱ्यांना पटताना दिसत आहे.