‘दोस्तीगिरी’ सिनेमाच्या संगीताची भूरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 09:34 AM2018-08-17T09:34:46+5:302018-08-17T09:41:47+5:30
दोस्तीगिरी सिनेमातून मैत्रीच्या सुरेल नात्याची गुंफण तितक्याच सुश्राव्य संगीताव्दारे सिनेमाची म्युझिक टीम घेऊन आलेली आहे. मराठी आणि बॉलीवूड सिनेसृष्टीत नावजलेली संगीतकार जोडी रोहन-रोहन ह्यांनी ह्या सिनेमाचे संगीत दिले आहे.
दोस्तीगिरी सिनेमातून मैत्रीच्या सुरेल नात्याची गुंफण तितक्याच सुश्राव्य संगीताव्दारे सिनेमाची म्युझिक टीम घेऊन आलेली आहे. मराठी आणि बॉलीवूड सिनेसृष्टीत नावजलेली संगीतकार जोडी रोहन-रोहन ह्यांनी ह्या सिनेमाचे संगीत दिले आहे. तर प्राजक्ता शुक्रे, मीनल जैन, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, कविता राम आणि सावनी रविंद्र ह्यांनी गाणी गायली आहेत.
दोस्तीगिरी सिनेमात चार श्रवणीय गाणी आहेत. सिनेमाचे अक्षय शिंदेने लिहीलेले ‘तुझी माझी यारी- दोस्ती’ हे गाणे रोहन-रोहनने प्राजक्ता शुक्रेसोबत गायले आहे. ‘फसलाय काटा’ ह्या धमाल आयटम साँगचे बोल लिहीले आहेत, गणेश चंदनशिंवे ह्यांनी. आणि गाण्याला स्वरसाज चढवलाय, आनंद शिंदे आणि सावनी रविंद्र ह्यांनी. ‘सोडून सारे’ हे भावूक गाणे सचिन आवटे ह्यांनी लिहीले आहे. आणि आदर्श शिंदे-कविता राम ह्यांनी गायले आहे. जय अत्रेने लिहिलेले ‘माझ्या मनाला’ हे रोमँटिक गाणे मीनल जैनने गायले आहे.
सध्या दोस्तीगिरीच्या गाण्यांची भूरळ महाराष्ट्रवरच नाही. तर साऊथ कोरीयावरही आहे. ह्याविषयी रोहन-रोहन सांगतात, “दोस्तीगिरी सिनेमाची गाणी करताना ही गाणी महाराष्ट्रीयन रसिकांना आवडतील अशीच करण्याचे आमचे लक्ष होते. पण चार दिवसांपूर्वी साऊथ कोरीयातल्या एका फॅनने तिथल्या पबमध्ये 'फसलाय काटा' गाणे चालत असल्याचा व्हिडीयो पाठवला. आणि सुखद आश्चर्याचा मला धक्काच बसला.”
गायिका सावनी रविंद्र म्हणते, “मराठी गीत साऊथ कोरीयात वाजतायत, ही अर्थातच मराठी सिनेमासाठी खूप मोठी कॉम्पलिमेन्ट आहे. हे श्रेय मी रोहन-रोहन ह्यांना देईन, मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेली ही खूप टॅलेंन्टेड संगीतकार व्दयी आहे.”
गायिका प्राजक्ता शुक्रे सांगते, “मी रोहन-रोहनसोबत दोस्तीगिरी सिनेमाचा टायटल ट्रक गायल्यावरच हे गाणे युवावर्गाला आवडेल, असा विश्वास मला वाटत होता. आणि त्याप्रमाणेच सध्या युवावर्गातून गाण्याला कमालीचा प्रतिसाद मिळतोय.”
बॉलिवूडमधली सुप्रसिध्द गायिका मीनल जैनचे ‘माझ्या मनाला’ हे पहिले मराठी गाणे आहे. ती सांगते, “मराठीतले ळ किंवा झ हे शब्द गात असताना उचितपध्दतीने उच्चारणे गरजेचे असते. नाही तर अर्थ बदलतो. त्यामूळे मी उच्चरणावर खूप लक्ष दिलं. आणि मला खूप आनंद होतोय, की आज हे गाणे प्रत्येक रेडियो स्टेशनवर चालत आहे. “
संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे, मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित ‘दोस्तीगिरी’ 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.