...तेव्हा तोंडं का बंद होतात यांची; मराठी कलाकारांच्या नाटकीपणावर टिळेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:24 PM2022-03-07T19:24:37+5:302022-03-07T19:25:06+5:30

निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत मराठी कलाकारांवर टीका केली आहे.

'Drama Artists' Crowd', Mahesh Tillekar trolls on Marathi Artists | ...तेव्हा तोंडं का बंद होतात यांची; मराठी कलाकारांच्या नाटकीपणावर टिळेकरांची टीका

...तेव्हा तोंडं का बंद होतात यांची; मराठी कलाकारांच्या नाटकीपणावर टिळेकरांची टीका

googlenewsNext

निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत मराठी कलाकारांवर टीका केली आहे.  महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्टमध्ये लिहिले की, नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार कलाकारांची स्तुती करणारे काही ग्रुप, टोळी मराठी चित्रपटसृष्टीतली आहेत. अभिनय आणि चित्रपट कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या चित्रपटावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा, म्हणजेच बाहेरून आलेला कलाकार किंवा दिग्दर्शक असेल तर त्याच्या चित्रपटाकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

महेश टिळेकर यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, स्वतः ला सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात. काही दिवसांपूर्वी याच टोळीतील काही कलाकारांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी थिएटरमध्ये जाऊनच प्रत्येक मराठी चित्रपट पाहत असल्यामुळे तो नवीन प्रदर्शित झालेला चित्रपट पहायला गेलो. तर शो रद्द झालेला, दुसऱ्या दिवशी आणखी एका थिएटरवर पोहोचलो, तिथेही तीच अवस्था. शेवटी भांडून दोन तिकिटे काढून मित्रा बरोबर चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये एकूण सात जणच होते. पुरस्कार सोहळे, टिव्ही चॅनेलवरील रिएलिटी शोमध्ये स्वतःच्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या चित्रपटासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही, याचे दुःख झाले. पण प्रेस, मीडिया समोर बोलताना त्या चित्रपटातील आणि चित्रपट पाहायला स्टायलिश कपडे घालून आलेले हे ठराविक ग्रुपमधील कलाकार एकमेकांची अशी काही तळी उचलत होते. असा उदो उदो करत होते की राजदरबारी असणारे भाट पण कमी पडतील. आमचा चित्रपट मानवी भावनांचे कंगोरे दाखवणारा, संवेदनशील मनाला आर्त साद घालणारा, असे साजूक तुपातील, पुस्तकी शब्द वापरुन मध्येच त्याला इंग्रजीचा तडका देऊन मीडियाला बाईट देताना हे नाटकी बोलणारे काही स्टार पाहिल्यावर हसावं की रडावे असे झाले माझे.

ते  पुढे म्हणाले की, आपल्याच ग्रुप, कंपूमधील कलाकार, दिग्दर्शकांच्या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर स्वतःच्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार, दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात? स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या चित्रपटावर, अभिनयावर बोलताना तोंडं का बंद होतात यांची??? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो पोस्ट करणारे हे काही स्टार कलाकार आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट?” तर ही पोस्ट चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही असे ही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: 'Drama Artists' Crowd', Mahesh Tillekar trolls on Marathi Artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.