स्मशानातला जन्म, भुतांची मुक्ती अन् बरंच काही; सिद्धार्थ जाधव-मकरंद अनासपुरेंंच्या 'एक डाव भूताचा' सिनेमाचा धमाल ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:47 IST2024-09-20T13:46:04+5:302024-09-20T13:47:01+5:30
एक डाव भुताचा सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज. मकरंद अनासपुरे-सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाची जुगलबंदी (siddharth jadhav, makrand anaspure)

स्मशानातला जन्म, भुतांची मुक्ती अन् बरंच काही; सिद्धार्थ जाधव-मकरंद अनासपुरेंंच्या 'एक डाव भूताचा' सिनेमाचा धमाल ट्रेलर
मराठीमध्ये यावर्षी २०२४ मध्ये अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. सत्यशोधक, शिवरायांचा छावा, नाच गं घुमा, स्वरगंधर्व सुधीर फडके अशा विविध विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. मराठीमध्ये लवकरच एक नवीन चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव म्हणजे 'एक डाव भुताचा'. सिद्धार्थ जाधव-मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.
'एक डाव भुताचा' सिनेमाचा ट्रेलर
स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट 'एक डाव भूताचा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक भूत मुक्ती मिळवण्यासाठी एका तरुणाच्या आयुष्यात येतं. मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचं प्रेम असलेली तरुणी त्याला मिळवून देण्याचा डाव तरुण आणि भूत यांच्यात ठरतो. त्यामुळे भूताला मुक्ती मिळते का? तरुणाला त्याचं प्रेम मिळतं का ? याची धमाल गोष्ट "एक डाव भूताचा" या चित्रपटात आहे. या गोष्टीला प्रेमकथा, विनोदाची रंजक फोडणीही असून अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात आहे.
कधी रिलीज होणार एक डाव भुताचा?
रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर धमाल आहे म्हटल्यावर चित्रपट सुद्धा भारी असेल यात काही शंका नाही.