देवा, एकटेपण देऊ नकोस...! जगाला हसवणाऱ्या दादा कोंडके यांचे ‘ते’ काळीज चिरणारे शब्द...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:00 AM2021-07-14T08:00:00+5:302021-07-14T08:00:07+5:30
Dada Kondke : द्विअर्थी संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून अनेकवेळा त्यांनी टीकाही सहन केली. पण या टीकेपलीकडे दादांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
दादा कोंडके (Dada Kondke )आज आपल्यात नाहीत. पण मराठी चित्रपटप्रेमींच्या हृदयावर कोरलेलं हे नाव कधीही विस्मरणात जाणे शक्य नाही. द्विअर्थी संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून अनेकवेळा त्यांनी टीकाही सहन केली. पण या टीकेपलीकडे दादांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यांचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग होता आणि या मायबाप प्रेक्षकांनी दादांचे चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतले.
14 मार्च 1998 रोजी दादा आपल्याला सोडून गेले. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण हस-या या चेह-यामागे, खूपसं दु:ख दडलेलं असतं, असं म्हणतात ना. दादांबद्दलही तेच होतं. आयुष्यातला एकाकीपणा त्यांना छळत होता. त्यांनी कधीही तो जगापुढे दिसू दिला नाही. मात्र ‘एकटा जीव’ या त्यांच्या चरित्राच्या शेवटच्या पानावरून मात्र त्यांचा हा ‘एकटेपणा’ पहिल्यांदा जगापुढे आला.
‘एकटा जीव’ (Ekta Jeev) या पुस्तकात दादा कोंडके यांनी आयुष्यातील अनेक गोष्टी खुलासा केला आहे. आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला गेलेला आहे. परंतु चरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिलेले दादांचे शब्द खूपच बोलके आहेत.
काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये...
आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दु:ख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बºयाच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे,’ असं दादांनी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलं आहं.