एली अवरामचा 'इलू इलू’ सिनेमा ३१ जानेवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:15 IST2025-01-25T17:14:22+5:302025-01-25T17:15:26+5:30

Ilu Ilu Movie : अभिनेत्री एली अवराम हिने 'इलू इलू' चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे.

Elli Avram's 'Ilu Ilu' is releasing on January 31st. | एली अवरामचा 'इलू इलू’ सिनेमा ३१ जानेवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

एली अवरामचा 'इलू इलू’ सिनेमा ३१ जानेवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोर पावलांनी अलगद येते आयुष्यात.  सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली  असतेच या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

बॉलिवूड गाजवलेली अभिनेत्री एली अवराम हिने 'इलू इलू' चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. 

एली अवरामसोबत दिसणार हे कलाकार
एली सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटातील मनाचा ठाव घेणारी 'इलू इलू', 'गुलाबी गुलाबी', 'सोडव रे देवा' ही तीनही गाणी सध्या गाजतायेत. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.



‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे

Web Title: Elli Avram's 'Ilu Ilu' is releasing on January 31st.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.