Exclusive : अभिनेता अनिकेत विश्वासरावचा ह्या अभिनेत्रीसोबत पार पडला साखरपुडा
By तेजल गावडे | Published: August 6, 2018 11:45 AM2018-08-06T11:45:04+5:302018-08-06T11:57:51+5:30
'लाल इश्क' सिनेमात झळकलेली अभिनेत्री स्नेहा चव्हाणचा अनिकेत सोबत साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला.
मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता अनिकेत विश्वासरावचा ५ ऑगस्टला पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला. त्याची जोडीदार कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल ना... अहो, ही अभिनेत्री तुमच्या चांगलीच परिचयाची आहे. स्वप्नील जोशी अभिनीत 'लाल इश्क' सिनेमात झळकलेली अभिनेत्री स्नेहा चव्हाणचा अनिकेत सोबत साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला आणि ही माहिती खुद्द स्नेहाने इंस्टाग्रामवर स्टोरीवर दिली आहे.
याबाबत स्नेहाला विचारले असता ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे.आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.
स्नेहा मुळची पुण्याची असल्यामुळे हिंजवडीमध्ये साखरपुडा झाला. लग्नासाठी आता अवकाश आहे. कारण आम्हाला दोघांना खूप काम करायचे आहे. आमचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनलाही लवकरच सुरूवात होणार आहे, असे स्नेहा सांगत होती.
अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.