Exclusive: 'शिवरायांचा इतिहास लोकांसमोर मांडताना..'; अभिनेत्री दिप्ती धोत्रेने सांगितला 'शेरशिवराज'चा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:05 PM2022-04-27T15:05:28+5:302022-04-27T15:22:23+5:30
Dipti dhotre:दिप्तीने शेर शिवराजमध्ये राजे सावंत यांच्या पत्नीची सावंतीणीची भूमिका साकारली आहे.
'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटाच्या अफाट यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा बहुचर्चित ठरलेला चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अफझलखान वधाचा चित्तथरारक प्रसंग अनुभवता आला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यामध्येच अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिने या चित्रपटात साकारलेल्या तिच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.
'शेर शिवराज' या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसह अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. यामधलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री दिप्ती धोत्रे. भोंगा', 'मुळशी पॅटर्न' आणि 'विजेता' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलेल्या दिप्तीने शेर शिवराजमध्ये राजे सावंत यांच्या पत्नीची सावंतीणीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी बोलत असताना तिने चित्रपटातील अनुभव महाराजांप्रती असलेला आदर यांविषयी भाष्य केलं.
"शिवाजी महाराजांच्या चित्रपटाच भाग असणं हेच माझ्यासाठी शिवरायांवर असलेलं प्रेम प्रकट करणं आहे," असं दिप्ती म्हणाली.
पुढे ती म्हणते," शिवरायांचा इतिहास लोकांसमोर मोठ्या पडदयावर मांडताना त्यात थोडाफार का होईना माझाही सहभाग आहे. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला कोंकणी भाषा बोलावी लागली, यासाठी मी दिग्पाल सरांची मदत घेतली, माझं काम लोकांना आवडतंय याचा मला आनंद आहे, मुळात चित्रपट लोकांना आवडतोय यातच सगळं आलं."
दरम्यान, या चित्रपटात दीप्ती सोबत दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर , मुकेश ऋषी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 'शेर शिवराज'नंतर दिप्ती लवकरच 'भिरकीट' आणि 'विषय क्लोज' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच ती, उर्वशी रौतेला आणि रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्येही झळकणार आहे.